
नाशिक । फारूख पठाण Nashik
नाशिक महापालिका निवडणूक Nashik Municipal Corporation Upcoming Elections आता फक्त दोन महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. नाशिक महापालिकेत यंदाच्या वेळी अकरा नगरसेवक Corporators जास्त राहणार आहे. त्याचप्रमाणे त्रिसदस्यीय प्रभाग रचना असणार असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने नुकताच प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा आयोगाकडे सादर केला आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या कामाला Election works गती दिली आहे.
कधीही महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाच्या वतीने त्याबाबतची तयारी देखील सुरू झाल्याचे दिसत आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली विकासकामांच्या नामफलकांना काळे फासून ते विद्रुप करण्याचे प्रकार व्हायचे, मात्र यापुढे असे प्रकार बंद होणार आहेत.
आचारसंहिता संपल्यानंतर या फलकांना पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्च न परवडणारा असल्याने या फलकांना काळे न फासता ते केवळ झाकून ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक आयुक्त कैलास जाधव यांनी काही दिवसांपूर्वी जारी केले आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे उभारली जातात.
लोकप्रतिनिधींनी सुचविल्यानंतर महासभा, स्थायी समिती आणि प्रभाग समित्यांच्या सभांमध्ये या विकासकामांना मंजुरी दिली जाते. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर या विकासकामांच्या भूमिपूजन तसेच उद्घाटनाच्या वेळी लोकप्रतिनिधींची नावे असलेले नामफलक उभारले जातात. निवडणुका आल्यानंतर मात्र आचारसंहितेचे पालन करताना प्रशासकीय यंत्रणेमार्फत या नामफलकांवर तसेच जाहिरात फलकांना काळे फासले जाते.
फलकांचे विद्रुपीकरण केले जाते. मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी हे केले जात असले तरी निवडणुका आणि आचारसंहिता संपल्यानंतर मात्र हे नामफलक, जाहिरात फलक पूर्ववत करून द्यावे लागतात. त्यासाठी निधी खर्च करावा लागतो. यामुळे एकप्रकारे जनतेच्या पैशाची उधळपट्टीच होते.
यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त जाधव यांनी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार आचारसंहिता काळात विकासकामांचे नामफलक तसेच जाहीरात फलकांना काळे फासून विद्रुप न करता ते केवळ झाकून ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.
निवडणूक लांबणीवर?
सध्या ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या चर्चा, त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून निर्माण झालेल्या ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या दुसर्या महिन्यात होणार्या नाशिक महापालिकेची निवडणूक पुढे जाण्याची चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृत याबाबत बोलण्यास कोणीही तयार नाही. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने एकूण 43 त्रिसदस्य प्रभाग तर एक 4 सदस्य प्रभागाची रचना तयार करुन कच्चा आराखडा 29 नोव्हेंबर 2021 रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे रवाना केला आहे. यामुळे आता सर्वांच्या नजरा आयोगाकडे लागल्या आहेत.
नियोजन सुरू
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सुमारे दहा कोटी रूपये पेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. 2017 साली सुमारे साडेसात कोटी रुपये खर्च झाले होते. त्याच प्रमाणे यंदा त्या पेक्षा जास्त खर्च लागणार असल्यामुळे त्या संदर्भात नियोजनदेखील सुरू आहे. तसेच निवडणुकीसाठी लागणारे सेवक, अधिकार्यांची संख्या, बूथ संख्या, बूथनिहाय लागणार्या मतदान यंत्राची संख्या, या सर्वांचे नियोजन देखील प्रशासनाच्यावतीने सुरू आहे.