'हर घर तिरंगा' उपक्रमाची जय्यत तयारी

मनपा खरेदी करणार 2 लाख तिरंगा झेंडे
'हर घर तिरंगा' उपक्रमाची जय्यत तयारी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे आझादी का अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav)साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम ( Har Ghar Tiranga Campaign ) राबविण्यात येणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा प्रत्येक घरावर फडकवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सूचना देखील केल्या असून नाशिक शहरात दोन लाख घरांवर तिरंगा झेंडा लावण्यात येणार आहे. यासाठी नाशिक महापालिका ( NMC )दोन लाख झेंडे खरेदी करून नागरिकांना वाटप करणार आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम होत असला तरी त्यासाठी वेगळा असा कोणताही प्रकारचा निधी महापालिकेला प्राप्त झालेला नाही. यामुळे चालू खात्यातील रकमेतून विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून 22 ते 25 रुपये दरम्यान किंमत असलेला 30 इंच बाय 20 इंच आकाराचा तिरंगा झेंडा दांडासह नाशिक महापालिका खरेदी करणार आहे.

जीपीएस यंत्रणाच्या माध्यमातून शहरातील घरांचा तसेच इमारतींचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार 1 लाख 97 हजार घरे किंवा इमारती नाशिक शहर परिसरात असल्याचा नाशिक महापालिकेचा अंदाज आहे. यामुळे सरासरी दोन लाख घरांवर झेंडा फडकवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. शासनाच्या आदेशानुसार शहरी भागातील झेंड्याची मागणी विभागीय महसूल आयुक्तांकडे करण्यात येऊन ती राज्य शासनाकडे जाईल व तिथून झेंड्यांचे पार्सल मिळणार आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेने महसूल आयुक्तालयाकडे 2 लाख झेंडे खरेदीसाठी प्रस्ताव देण्याचे समजते आहे.

असे होणार वितरण

नाशिक महापालिकेला साधारण 30 जुलैपर्यंत झेंडे प्राप्त होणार आहेत. 1 ऑगस्टपासून त्याचे वितरण शहरातील सर्व विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे. याबाबत विभागीय अधिकार्‍यांना विशेष सूचना देखील देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागात एक स्वतंत्र टेबल यासाठी लावण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली मागणी तिकडे नोंदवून आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी, ज्या भावात शासनाकडून झेंडा मिळणार आहे ती रक्कम देखील नागरिकांनी तिथे जमा करून झेंडा खरेदी करायचा आहे.

तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ते आपल्या घरावर किंवा इमारतींवर लावायचा आहे. त्याचप्रमाणे 15 ऑगस्टला संध्याकाळी नियमाप्रमाणे त्याची रितसर पुढील कारवाई करण्याबाबत देखील जनजागृती विभाग अधिकार्‍यांच्या माध्यमातून होणार आहे.

आजादी का अमृत महोत्सव हा अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. नाशिक महापालिका मुख्यालयासह शहरातील सर्व विभागीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.तसेच राजीव गांधी मुख्यालय असलेल्या प्रवेशद्वारावर भव्य एलईडीच्या माध्यमातून नागरिकांना याबाबत होणारे सर्व कार्यक्रम दाखविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागांमध्ये देशभक्तिपर कार्यक्रम देखील होणार आहेत.

सुरेश खाडे, अतिरिक्त आयुक्त, मनपा नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com