
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आयुष्यात शिक्षणाचा महत्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे (SSC Exam) पाहिले जाते. मात्र अनेकांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून शिक्षणापासून (Education) वंचित रहावे लागते. अनेक जणांवर कमी वयातच कुटुंब चालवण्याची जबाबदारी येऊन पडते. त्यामुळे अनेकांना मधूनच शिक्षण सोडून द्यावे लागते. मात्र, वय वाढत असतानाही शिकण्याची ओढ काही जणांना स्वस्थ बसू देत नाही. या ओढीतूनच एका विद्यार्थ्याने तब्बल २४ वर्षांनी दहावी पास होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे....
कुसमाडी गावचे प्रकाश शेजवळ (Prakash Shejwal) यांनी १९९९ साली दहावीची परीक्षा दिली. मात्र परीक्षेत गणित विषयात ते अनुतीर्ण झाले आणि त्यांनी काही कारणास्तव शिक्षण सोडून दिले होते. मात्र आपले दहावी पास होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने त्यांनी तब्बल २४ वर्षानंतर पुन्हा एकदा दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. गणित विषयात १०० पैकी ६९ गुण मिळवून त्यांनी ते दहावी पास झाले. शेजवळ यांचे दहावी पास होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.
शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. एकेकाळी सुटलेले शिक्षण पूर्ण करून आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात देता येते, हे शेजवळ यांनी सिद्ध केले आहे. २४ वर्षानंतर शेजवळ दहावी पास झाल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.