साहित्य अकादमी पुरस्कार समस्त नाट्यलेखकांचा

साहित्य अकादमी पुरस्कार समस्त नाट्यलेखकांचा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

परशुराम सायखेडकरच्या रंगमंचावर माझे देवबाभळी (Devbabhali) नाटक सुरु झाले त्याच रंगमंचावर माझा सत्कार होत आहे, याचा आनंद आहेच, परंतु हा आनंद तेव्हा द्विगुणीत होईल, जेव्हा या नाट्यगृहासह महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहे नाटकासाठी खुली होतील, असे प्रतिपादन युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देवबाभळीकार प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) यांनी केले...

प्राजक्त देशमुख यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने (Sarvajanik Vachnalay Nashik) त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, नाटक हे साहित्य प्रकारात कायमच दुर्लक्षित राहिले आहे. साहित्यिकांकडून त्याला कायमच विंगेतली जागा दाखविली आहे. माझ्या देवबाभळी नाटकाला साहित्य अकादमीचा जो पुरस्कार मिळाला त्यामुळे नाटक हे साहित्य प्रकारात केंद्रस्थानी आले आहे. हा माझा गौरव नसून समस्त नाट्यलेखकांचा आहे.

नाटककार दत्ता पाटील (Datta Patil) म्हणाले की, देवबाभळीचे यश हे स्वच्छ यश आहे. मराठी नाटकाला साहित्याच्या प्रांतात कायमच दुय्यम स्थान मिळाले आहे. नाटक हे वाड्मय नाही असे म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे. नाटकाच्या संहितेला वाड्मय मूल्य आहे हे या नाटकाने अधोरेखित केले आहे. अस्सल मातीतून आलेल्या देशी साहित्याचा हा गौरव आहे.

सावानाचे (Savana) प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर (Jaiprakash Jategaonkar) म्हणाले की, सावानाच्या याच रंगमंचावर देवबाभळी ही एकांकिका सादर झाली. कालांतराने त्या एकांकिकेचे नाट्य रुपांतर याच रंगमंचावर झाले. त्यामुळे प्राजक्त यांचा पहिला सत्कार याच रंगमंचावर व्हावा अशी सावानाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली.

सावानाच्या वतीने उपाध्यक्ष नानासाहेब सोनवणे (Nanasaheb Sonawane) व संजय करंजकर (Sanjay Karanjkar) यांच्या हस्ते देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. देवदत्त जोशी (Devdutt Joshi) आणि शंकर बोऱ्हाडे (Shankar Borhade) यांनी आभार मानले.

कार्यक्रमास दिग्दर्शक सचिन शिंदे, विनायक रानडे, विनोद राठोड, प्रफुल्ल दीक्षित, श्रीपाद देशपांडे, प्रणव पगारे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com