
निफाड l Niphad (प्रतिनिधी)
निफाड तालुक्याच्या पश्चिम भागातील ओझर, पिंपळगाव, दिक्षी, दात्याने, खेरवाडी, कोकणगाव, सायखेडा, चांदोरी सह परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
वादळामुळे अनेक गावातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. बुधवारी अवकाळी पावसाने विदर्भात हजेरी लावल्या नंतर आज सायंकाळी वादळा सह पावसाने निफाड तालुक्यात हजेरी लावली सद्या तालुक्यात द्राक्ष हंगाम सुरू असून या वादळ वाऱ्याबरोबर बरसलेल्या पावसामुळे द्राक्ष घड जमिनीवर तुटून पडले आहे.
तर गहू, कांदा, मका, ऊस आडवा पडला असून हातात आलेले पीक निसर्गाच्या लहरी पणामुळे वाया गेले आहे. मागील वर्षी करोनामुळे पिके बेभावात विक्री करावी लागली तर यावर्षी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने अशा प्रसंगी मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
तालुक्यात विजेचा गडगडाट आणि वादळ वाऱ्यासह बरसणारा अवकाळी पाऊस यामुळे सायंकळच्या वेळेस अनेक गावातील व शिवारातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. रात्री उशिरा या पावसाने संपूर्ण तालुक्यात हाहाकार उडून दिला. या बेमोसमी पावसामुळे हातात आलेली पिके पूर्णपणे वाया गेली असून नुकसानीचा खरा आकडा लवकरच समजेल.