'परिवर्तन' झाले, पण जबाबदारीही वाढली!

मविप्र संस्थेत 'ठाकरे पर्वा'चा उदय
'परिवर्तन' झाले, पण जबाबदारीही वाढली!

नाशिक | विजय गिते | Nashik

मराठा समाजाची अस्मिता असलेल्या मराठा विद्या समाज संस्थेच्या निवडणुकीत (MVP Election) सभासदांनी सत्ता परिवर्तन घडवून तब्बल २० वर्षांच्या पवार कुटुंबियांच्या गडाला जबरदस्त हादरा दिला. 'प्रगती'ला (Pragati) साथ न देता यंदा 'परिवर्तन' (Parivartan) घडवले. संस्थेवरील 'दादा' आणि 'ताई'गिरीला सभासदांनी चाप बसवत त्यांची सद्दी मोडीत काढली...

सूज्ञ सभासदांनी परिवर्तनाचा इतिहास घडवला. तब्बल पंधरा वर्षांहून अधिक काळ मविप्रतील यशापासून वंचित असलेल्या नितीन ठाकरे यांनी यावेळी यशाला गवसणी घातली. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि संयमाच्या बळावर अखेर संस्थेत 'ठाकरे पर्वा'चा उदय झाला. 'भगवान के घर देर है, अंधेर नही' या उक्तीप्रमाणे नितीन ठाकरे (Nitin Thakare) यांच्या अविरत संघर्षाला निर्भेळ यश मिळाले.

संस्थेच्या सभासदांनी प्रगतीची साथ सोडून 'परिवर्तन' घडवले हे खरे असले तरी त्याबरोबरच ठाकरे यांची जबाबदारीही वाढली आहे. सरचिटणीसपदाचा काटेरी मुकुट घेऊन ठाकरे यांना सभासदांच्या अपेक्षा शक्य होईल तितक्या पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून, म्हणजे डॉ. वसंत पवार यांचे निधन झाल्यानंतर निलिमा पवार यांनी सरचिटणीसपदाची धुरा सांभाळली. सलग दहा वर्षे हातात सत्ता असल्याने त्यांना सत्ताविरोधी वातावरणाचा (अँटीइंकबन्सी) फटका बसला.

गेल्या वेळी निसटता पराभव पत्करावा लागलेल्या नितीन ठाकरे यांनी यंदा मात्र नीलिमाताईंविरोधात सरचिटणीसपदी मोठया मतांच्या फरकाने निवडून येत त्याची सव्याज परतफेड केली. 'परिवर्तन' पॅनलचे उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून आले असताना याच पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार माणिकराव कोकाटे मात्र सुनिल ढिकले यांच्याकडून पराभूत झाले. एकटे माणिकराव सोडून नितीन ठाकरे यांचे पूर्ण पॅनल निवडून आले, त्यामुळे 'गड आला पण, सिंह गेला' अशी पॅनलची स्थिती झाली आहे.

निफाड तालुक्यात 'मविप्र'चे सर्वाधिक मतदार आहेत. साहजिकच निफाड तालुका ठरवेल तोच 'मविप्र' सरचिटणीस व निफाड तालुक्यातील उमेदवारच 'मविप्र' सरचिटणीस होईल, या समजाला आणि समिकरणाला यावेळी तडा गेला. तोही निफाडकरांमुळेच! तालुक्याबाहेरील उमेदवाराला सरचिटणीसपदी बसवून निफाडकरांनी वेगळा संदेश देऊन 'भाकरी फिरवली' आहे.

शिवाय शैक्षणिक संस्थेत कोणा एका कुटुंबाची सद्दी नाही हेही निफाडकरांनी दाखवून दिले. संस्थेवर सरचिटणीस निफाडचाच असावा हा समजही निफाडकरांनी पुसून काढला आहे. शैक्षणिक संस्थेत हुकूमशाही नव्हे तर लोकशाही चालते हेही सभासदांनी कृतीतून दाखवून दिले. बाह्यशक्तीचा प्रभाव हाही मुद्दा निवडणूक प्रचारकाळात जोरदार चर्चेला गेला. आरोप-प्रत्यारोपंच्या फ़ैरीही या काळात झडल्याने ही निवडणूक वेगळ्या अर्थाने गाजली.

निलीमा पवार (Nilima Pawar) मविप्र सरचिटणीस असल्या तरी त्यांच्या कामात त्यांचे चिरंजीव प्रणव व कन्या अमृता यांचा संस्थेच्या कारभारात वाढता हस्तक्षेप हाही प्रचाराचा मुद्दा विरोधकांनी जोरदार लावून धरला. सभासदांच्या मनावर ही बाब बिंबवण्यात नितीन ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी ठरले.

परिणामी सभासदांना प्रगती तर हवी आहे, पण ती परिवर्तनातून हवी आहे, असाच जणू संदेश सभासदांनी निकालातून दिला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सरचिटणीस नितीन ठाकरे यांची जबाबदारी आता वाढली आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने, सत्ताधाऱ्यांवर केलेले आरोप या सर्व बाबी लक्षात घेऊन संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागणार आहे. सभासदांनी टाकलेला विश्वास ठाकरे यांना सार्थ ठरवावा लागेल.

निवडणुकीत भ्रष्टाचार, गैरव्यवहार, घराणेशाही, हुकूमशाही, दादागिरी, ताईगिरी, बाह्यशक्ती असे अनेक शब्दप्रयोग सत्ताधारी व विरोधी गटांकडून मोठ्या प्रमाणात केले जाऊन सभासदांना भुलवण्याचा प्रयत्न झाला. मात्र सभासदांनी संस्थेची सत्ता कोणाच्या हाती द्यायची ते निवडणुकीपूर्वीच ठरवून टाकले होते. एवढेच नव्हे तर ते मतदानातून दाखवूनही दिले. आता निवडणूक संपली आहे.

'मविप्र'सारख्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शिक्षण संस्थेला एका उंचीवर नेण्याचे काम नव्या कारभाऱ्यांना करायचे आहे. या कारभाऱ्यांनी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून 'मविप्र' ही शैक्षणिक संस्था असल्याचे भान कायम ठेवले पाहिजे. निवडणूक काळात निर्माण झालेली कटुता दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी विसरून संस्थेच्या विकासासाठी आणि संस्थेला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, हीच सभासदांची मनोमन इच्छा असेल.

मतदारांचा संदेश

निवडणूक काळात सत्ताबाह्य आणि कुटुंबकेंद्रीत सत्तेला सभासद त्रस्त झाल्याचे विरोधकांचे आरोप सभासदांनाही भावले. त्यामुळे त्याबाबतचा उद्रेकही उफाळून आला. भ्रष्ट मार्गाच्या लक्ष्मीदर्शनाला न भुलता सभासदांनी सदसदविवेकबुद्धीने आपले मताचे दान खऱ्या अर्थाने ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांच्या पारड्यात टाकले.

राजकारणात जय-पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे यश मिळाले म्हणून हुरळून न जाता नव्या कार्यकारिणीला अधिक जबाबदारीने काम करून सभासदांच्या अपेक्षापूर्तीसाठी मेहनत करावी लागणार आहे. त्याकडे सभासदांचेही लक्ष असेल. त्याचवेळी आपला पराभव का झाला? याचे आत्मचिंतन सत्तेवरून पायउतार झालेल्यांनी खचून न जाता करणे आवश्यक आहे. मविप्र निवडणुकीतून मतदारांनी दोन्ही पॅनलच्या कारभाऱ्यांसाठी दिलेला हा मोलाचा संदेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com