नाशिक | Nashik

त्र्यंबकरोडवरील टपाल विभागाच्या मुख्यालयातील एटीएम सेवा गेल्या आठवडाभरापासून ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तांत्रिक अडचणींमुळे एटीएम मशीन बंद असल्याने नागरिकांना दुसऱ्या ठिकाणांहून आर्थिक व्यवहार करण्याची वेळ आली आहे.

सरकारी तसेच खासगी बँकांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारतीय टपाल विभागानेही इंडियन पोस्ट बँक तसेच पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक सुरू केली. या बँकांच्या माध्यमातून नागरिकांसाठी एटीएम मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्यानुसार त्र्यंबकरोडवरील टपाल विभागाच्या मुख्यालयात तसेच नाशिकरोड व इगतपुरीच्या टपाल कार्यालयात एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, तिथेच एटीएम मशीन बंद असल्याने त्यांची कुंचबणा होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात पोस्टाचे अवघे तीन एटीएम असताना त्यापैकी एका एटीएमची सेवा बंद असल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार न करताच माघारी फिरावे लागत आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची अडचण होत असून, पोस्टाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टपाल विभागाने तत्काळ एटीएम सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.

एटीएममध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ते बंद आहे. एटीएम सेवा पूर्ववत करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर तसेच संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत एटीएम पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत नागरिकांनी टपाल विभागाला सहकार्य करावे.

- संदेश बैरागी, वरिष्ठ पोस्टमास्तर, टपाल विभाग, नाशिक.