आरोग्य विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम

आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांची माहिती
आरोग्य विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ Maharashtra University of Health Sciences येथे महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था Maharashtra Post Graduate Medical Education and Research Institute सुरू करण्यासाठी एकूण 7 विषयांना शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांची निवड करून आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे या वर्षापासून पदुव्यत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर उपस्थित होते.

भुजबळ यांनी आरोग्य विद्यापीठात सुरू होणार्‍या अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. औषध वैद्यकशास्त्र 12, बालरोग चिकित्साशास्त्र 6, शल्य चिकित्साशास्त्र 12, अस्थिरोगशास्त्र 6, भूलशास्त्र 14, स्त्रीरोग चिकित्सा व प्रस्तुतीशास्त्र 6, अपत्कालीन औषध वैद्यकशास्त्र 3 अशा 59 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एकूण 49 अनुभवी अधिष्ठाता व विशेषतज्ज्ञांची नेमणूक करण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे.

27 ते 31 जानेवारी 2022 या दरम्यान मुलाखती होऊन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. हा प्रकल्प हा 670 कोटी रूपयांचा आहे. विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीच्या कामकाजाबाबत आवश्यक सर्व प्रमाणपत्र, सामंजस्य करार व इतर महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत इमारत बांधकाम संदर्भात प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास शासनस्तरावर मान्यता मिळण्यासाठी मी स्वत: लक्ष घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे बांधकाम करतांना अनुभवी तज्ज्ञ वास्तु विशारदाची नेमणूक करुन त्यांच्यामार्फत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने उत्कृष्ट प्रतिचे बांधकाम करावे अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या.

सरकारी निधी 60 टक्के

कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी शासनाचा 60 टक्के व आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 40 टक्के निधी या तत्वावर काम करण्यात येणार आहे, असे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com