मध्य रेल्वे-पोस्टातर्फे टपालसेवा
नाशिक

मध्य रेल्वे-पोस्टातर्फे टपालसेवा

मुंबई, पुण्यानंतर नाशिकरोड रेल्वेस्थानकात पार्सल सेवा सुरु

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी NashikRoad

टपाल खाते आणि मध्य रेल्वेने मुंबई, पुण्यानंतर नाशिकरोड रेल्वेस्थानकात पार्सल सेवा सुरु केली आहे. त्यातंर्गत ग्राहकांच्या घरापासून पार्सल जमा करुन ते पोहचविले जाणार आहे. टपाल खाते हे ग्राहकाकडून पार्सल जमा करुन ते जवळच्या रेल्वेस्थानकापर्यंत पोहचवेल. रेल्वे हे पार्सल ग्रहणकर्त्या ग्राहकाच्या जवळच्या रेल्वेस्थानकात पोहचवेल. तेथून टपालखाते ते घेऊन ग्राहकापर्यंत पोहोचवेल अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

पोस्ट ऑफिसमध्ये बुकींग केलेले दहा किलोपर्यंतचे पार्सल टपालखाते स्वीकारेल. नंतर ते जवळच्या रेल्वेस्थानकात अथवा एसटी महामंडळाच्या कार्यालयाकडे जमा करेल. ते ठरलेल्या गावी पोहचल्यानंतर पोस्ट ऑफिस ते जमा करुन ग्राहकापर्यंत पोहचवेल असे ठरले होते. आता पोस्टाची पार्सल व्हॅन ग्राहकाकडे जाऊन रेल्वेने परवानगी दिलेले कितीही वजनाचे पार्सल स्वीकारेल .

लॉकडाऊनच्या काळात रस्ता वाहतूकीवर निर्बंध होते तेव्हा रेल्वेने विशेष पार्सल ट्रेन सुरु करुन ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. आता पोस्टाच्या मदतीने नागपूर, पुणे, मुंबई, नाशिकला पार्सल सेवा सुरु केली आहे. लहान रेल्वेस्थानक तसेच राज्यभरात तिची व्याप्ती वाढविली जाणार आहे. तळागाळापर्यंत ही सेवा देण्याचा रेल्वेचा मानस आहे.

Deshdoot
www.deshdoot.com