जिल्ह्यात पोस्ट कोविड सेंटर सुरु करणार : पालकमंत्री छगन भुजबळ

Minister Chhagan Bhujbal
Minister Chhagan Bhujbal

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. करोना मुक्त झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा करोना बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर पोस्ट कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

रविवारी (दि.6) झालेल्या करोना सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, पोलिस अधिक्षक सचिन पाटील, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, महानगरपालिकेचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतिश भामरे आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, करोनाबाधितांची संख्या सप्टेंबर महिन्यापर्यंत काही प्रमाणात कमी झाली होती. परंतू दसरा, दिवाळी या सणानंतर दररोज साधारण 80ते 100 ने रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पहिली लाट संपलेली नाही. यादरम्यान कोविड उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा करोनीची लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्यावर देखील उपचार करणे आवश्यक असल्याची बाब जिल्हाधिकारी मांढरे यांनी पालकमंत्री यांचे निदर्शनास आणून दिली. यावेळी करोनातून बरे झालेल्या रुग्णांना देखील काही प्रमाणात वेगवेगळ्या समस्या उद्भवत असल्याने जिल्ह्यांमध्ये पोस्ट कोबिड मार्गदर्शन केंद्रे सुरू होणे आवश्यक असल्याचा मुद्दा बैठकीत चर्चिला गेला.

या पोस्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोविडमधून बरे झाल्यानंतर देखील रुग्णांनी काय काळजी घेण्यात यावी, याबाबत आरोग्य यंत्रणेने नागरिकांमध्ये प्रचार व प्रसिद्धी करावी. ज्यामुळे कोविडबाधित आणि कोविडमधून बरे झाल्यानंतरच्या रूग्णांमधील वाढीला वेळीच नियंत्रणात आणणे शक्य होईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोविड चाचण्यांची संख्या देखील वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. तपासणी अहवाल त्याच दिवशी मिळण्यासाठी ऑटोमॅटिक एक्स्ट्रशन मशिन देखील बिटको रुग्णालयात बसविण्यात येणार आहे.

ज्याप्रमाणे जिल्ह्यात ऑक्सिजनसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आला त्याचप्रमाणे टेस्टींग लॅबच्या माध्यमातून जिल्ह्याबाहेरील यंत्रणावर अवलंबून न राहता आपल्या जिल्ह्यातच तपासणी अहवाल मिळू शकतील आणि आपण स्वत:च्या ताकदीवर या संकट काळात उभा खंबीरपणे उभे राहू, असे नियोजन प्रशासनाने केल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com