नाशिक । प्रतिनिधी Nashik

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार शाळांना नोंदणी करण्यासाठीची मुदत शनिवारी (दि. 30) संपली. या मुदतीत जिल्ह्यातील 221 शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमध्ये 2 हजार 25 जागा उपलब्ध आहेत. अल्प प्रतिसाद मिळाल्याने शाळांना नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव ठेवण्यात येतात. या जागांवर प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील शाळा नोंदणीसाठी 21 ते 30 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीअखेरपर्यंत केवळ 215 शाळांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

शिक्षण विभागाच्या जाचक अटी व शुल्क प्रतिपुर्तीसाठी होणारा विलंब यामुळे शाळांकडून नोंदणी प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे. आरटीई अंतर्गत मागील वर्षी जिल्ह्यातील 447 शाळांमध्ये 5 हजार 307 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा केवळ पन्नास टक्केच प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेसाठी शाळांना मुदतवाढ देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी, शाळेचा प्रवेशस्तर आणि रिक्त जागांचा तपशील संबंधित गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापक यांनी तपासून पाहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील काही शाळांकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेतून बाहेर राहण्यासाठी विविध पळवाटा शोधल्या जात असल्याने अशा शाळांवर शाळांची मान्यता रद्द करण्यासारखी कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.