मनपा स्थायी समिती सदस्य प्रश्न निकाली निघण्याची शक्यता

सत्ताधारी भाजपमध्ये खलबते सुरू
मनपा स्थायी समिती सदस्य प्रश्न निकाली निघण्याची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका ( NMC ) स्थायी समिती सदस्यपदाच्या राजीनाम्यावरून सध्या सत्ताधारी भाजपमध्ये ( BJP ) खलबते सुरू आहेत. यामुळे आठ जुलै रोजी नाशिकमध्ये येणार्‍या पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या समोर हा प्रश्न निकाली निघणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मागच्या महिन्यातच भारतीय जनता पक्षाने सभागृहनेते व भाजप गटनेते यांचे राजीनामे घेऊन नवीन सदस्यांना संधी दिली आहे. यामुळे स्थायी समितीत देखील तीन आणखी नव्या चेहर्‍यांना संधी मिळावीख अशी मागणी काही पदाधिकार्‍यांनी केली आहे.

नाशिक महापालिका बससेवेचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नाशिकचे संपर्कमंत्री जयकुमार रावल, माजी पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर नाशिकमध्ये 8 जुलै रोजी येणार आहे. यामुळे त्यांच्यासमोरच महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य वाद निकाली निघणार असल्याचे समजते.

स्थानिक पदाधिकार्‍यांनी याबाबत नियोजन देखील केल्याचे समजते. हा वाद सदस्य आणि शहराध्यक्षांच्या वादापर्यंत पोहोचला आहे. यामुळे आता पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. याआधीही स्थायी समिती सदस्य व इतर पदांवरील नियुक्तीनंतरही पक्षाने माजी महापौर रंजना भानसी, माजी सभापती हिमगौरी आडके-आहेर आणि मुकेश शहाणे यांची सदस्यपदी नियुक्ती केली.

या नियुक्तीमुळे भाजपमधील इतर सदस्यांची मने दुखावली गेल्याने अंतर्गत धुसफुस कायम आहे. सदस्यांमधील हा असंतोष दूर करण्यासाठी संबंधित तिन्ही सदस्यांचे राजीनामे घेऊन अन्य सदस्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी तसेच पदाधिकार्‍यांनी यापूर्वीच घेतला होता. परंतु, आता त्याला पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यामुळे अन्य सदस्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याच मुद्द्यावरून संबंधित तीन सदस्यांच्या राजीनाम्याबाबत पुन्हा खल सुरू झाला आहे.

राजीनामे आधीच घेतले?

मिळालेल्या माहितीनुसार हे तीनही सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत नसल्यामुळे वरिष्ठांसमोर पेच निर्माण झाला आहे. तर नियुक्तीचे वेळीच पक्षानेे सर्व सदस्यांचे राजीनामे घेऊन ठेवले होते. यामुळे पक्ष काय निर्णय देतो याकडे लक्ष केंद्रित आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद समोर आल्यामुळे चर्चांना ऊत आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com