नाशिक । प्रतिनिधी

आर्थिक वर्ष पूर्णपणे करोनाच्या सावटाखाली गेल्यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या उत्पन्नावर झाला आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या सन 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी पुढच्या आठवड्यात विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून तशी तयारी प्रशासनाने केली आहे. त्यासाठी सर्व विभागांकडून माहिती मागविण्यात आली असून यंदा मात्र जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात करोनामुळे मोठी घट झाल्याने त्याचा परिणाम अर्थसंकल्पातील तरतुदींवर होणार आहे.

एकूण उत्पन्नाचा काही भाग समाजकल्याण,महिला व बालकल्याण कृषी आणि पशुसंवर्धन विभागसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यामुळे विकासकामांना कितपत निधी शिल्लक राहील, याविषयी प्रशासन व पदाधिकारी साशंक आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजना राबवण्याची एकही विभागांना सूचना पाठवलेली नाही. मात्र, उत्पन्नाच्या घटीमुळे आहे त्याच योजनांना कात्री लागण्याबरोबरच काही विभागांच्या निधीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी अर्थसंकल्प 46 कोटींच्या आसपास होता.यंदा मात्र, तो 40 कोटींपेक्षा कमी असण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे सदस्यांना त्यांच्या गटात विकास कामे करण्यासाठी राखून ठेवण्यात येणार्या निधीवरही गंडांतर आले आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तरतुदींनुसार सदस्यांना वर्ष उलटूनही सेसचा निधी मिळालेला नाही.त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.