प्रभाग 31 : सुविधांपासून वंचित

प्रभाग 31 : सुविधांपासून वंचित

नवीन नाशिक | प्रतिनिधी/वार्ताहर | New Nashik

प्रभाग क्र. 31 मध्ये (Ward no 31) निवडणुकीच्या (Elections) जवळ येणार्‍या तारखांचा विचार करून लोकप्रतिनिधींच्या कामांना मागच्या काही दिवसांत वेग आलेला दिसून येत आहे. दरम्यान, मागच्या पावणेचार वर्षांत क्वचितच स्थानिक नगरसेवकांनी (Corporators) प्रभागात फेरफटका मारून नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या असतील की नाही त्याबाबतही शंका आहे, असा प्रभागातील स्थानिक नागरिकांचा सूर आहे...

प्रभाग 31 मध्ये भाजप (BJP) व शिवसेनेचे (Shivsena) प्रत्येकी दोन नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रभाग मोठा असला तरी अनेक सुविधांपासून वंचित राहिला आहे. प्रभाग 31 मध्ये गणेश कॉलनी, नगरकर लेनपासून ते इच्छापूर्ती चौक, राणेनगर, सिमेन्स कॉलनी, अनमोल नयनतारा, ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर, वासननगर, वडाळा- पाथर्डी रोड, पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावठाण परिसर, प्रशांतनगर, आयोध्या कॉलनी, नरहरीनगर, दामोदरनगर, फाळके स्मारक, पाथर्डी गाव, दाढेगाव पूर्व-पश्चिम, पिंपळगाव खांबपर्यंतचा परिसर व्यापलेला आहे.

प्रभागामध्ये मुख्यत्वेकरून अनेक ठिकाणीं रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी लाईटचे नुसते खांब आहेत, त्यावर लाईटचा पत्ता नाही. याशिवाय भूखंडावरील वाढलेले गवत, ठिकठिकाणी साचलेले घाणीचे साम्राज्य ,पाथर्डी फाट्यावर व इतर ठिकाणी अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी ही गेल्या कित्येक वर्षापासून दररोजची आहे. पाथर्डी गाव परिसरात गावठाण भागात असल्याने स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते .कॉलनी परिसरातही कचर्‍याचे ढीग, घाणीचे साम्राज्य आढळून येते.

दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरुपात मलमपट्टी केली आहे. याशिवाय अनेक भागात कचर्‍याची समस्या आहे. तसेच प्रभागातून जाणार्‍या नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने व त्यात कचरा जमा झाल्याने काही ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. यासाठी लोकप्रिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे. तितक्याच प्रमाणात नागरिकांचा निष्काळजीपणाही अनेक ठिकाणीं दिसुन येत आहे. शिळे अन्न पदार्थ, कचरा घंटा गाडीत न टाकता मोकळ्या पटांगणात टाकला जातो.

याशिवाय प्रभागात अनेक लहान मोठी उद्याने आहे. पण त्यांच्या देखभाली कडे नगरसेवकांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यात वासननगर, आयोध्या कॉलनी मनपा भूखंडावर खेळण्याच्या आजूबाजूला गाजर गवत वाढलेले आहे. तसेच प्रभाग 31- मध्ये अलकापुरी सोसायटी परिसरात असलेल्या उद्यानातील खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहे. याबाबत गेल्या नऊ वर्षांपासून अनेकदा पाठपुरवठा करूनही पूर्ण वेळ तोडगा काढण्यात येणारा प्रत्येक नगरसेवक लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहे.

यामध्ये उद्यानातील उत्सवासाठी म्हणून बांधलेले शेड, त्याच्या फरश्या, उद्यानाचे प्रवेश द्वार, पाण्याचा हापसा आदी तुटलेल्या, मोडलेल्या , जीर्ण अवस्थेत आहेत. तसेच साफसफाईचा नामोल्लेख दिसून येत नाही. उलट बंद उद्यान म्हणून टोळक्यांसाठी आडा झाला आहे.

  • राणेनगर भागात अद्यापही काही रस्त्यांचे काम झाले नसून मुख्य रस्त्यांना खड्डे पडल्याचे दिसते.

  • गुरू गोविंद शिंग कॉलेज समोरील भागातही वस्ती वाढली असून मूलभूत सुविधांपासून या भागाकडे दुर्लक्ष झालेले आहे.

  • ज्ञानेश्वर नगर भागातील अद्यापही रस्ते झाले नाहीत .

  • पाथर्डी फाटा ,आर के लॉन्स पासून ते दामोदर नगर पर्यंत असलेला मोठा रस्ता मागील 40 वर्षांपासून डांबरीकरणाच्या व रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणी व्यावसायिकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते .

  • समर्थ नगर, गजानन कॉलनी ,मुरलिधर नगरातील रस्त्यांनींही कात टाकली असून नवीन डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत ते आहेत .

  • पाथर्डी फाटा परिसर नाशिकचे प्रवेशदवार असल्याने उड्डाण पुलाखाली सुशोभिकरण होण्याची आवश्यकता असूनही वाहतूक नियंत्रण कक्ष तीन च्या समोर व पाठीमागे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पार्किंग केली जाते .

  • पाथर्डी गाव ,दाढेगाव भागात शौचालयाची दयनीय अवस्था झाली असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे .

  • प्रशांतनगर भागातील शैक्षणिकदृष्ट्या सर्वात जुनी असलेली मनपा शाळे साठी अद्याप पर्यंत भूखंड उपलब्ध झालेला नसल्याने अनेक प्रकारच्या सोयीसुविधांपासून विद्यार्थी वंचित आहेत.

  • गावठाण परिसरात ,म्हाडा च्या झालेल्या स्कीम मध्ये अनेक नागरिक उघड्यावरच शौचालयास बसत असल्याचे दिसून येते .

  • दादासाहेब फाळके स्मारकामध्ये अनेक प्रेमीयुगुलांचा संचार निर्धास्तपणे सुरू आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून व ऐतिहासिकष्ट्या महत्त्व असलेल्या पांडवलेणीच्या दृष्टीने विकास झालेला नाही.

प्रभागात तशा अनेक समस्या आहेत. रोडवरील पथदिवे बरेचदा बंद असतात. अनेकदा ड्रेनेजच्या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. यासोबतच मुलांना खेळण्यासाठी जागा नाही म्हणूनच काही वर्षापूर्वी थाटामाटात सुरू केलेली उद्याने आज धूळ खात पडून आहेत. अनेकदा पाठपुरवठा करूनही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला नाही. जागा वाया जावू नये, तिचा योग्य वापर व्हावा म्हणून सामजिक संस्था, लोकवर्गणी ने एकदा उद्यानात डागडुजी, साफसफाई, सुधारणा केल्या होत्या. परंतू कालांतराने परिस्थिती जैसे थे आहे.

- शुभम महाजन, सामाजिक कार्यकर्ते

पाथर्डी गावात ड्रेनेज, अतिक्रमण व सांडपाण्याची मोठी समस्या आहे. छोट्या-छोट्या गल्लीबोळातून जातांना अनेक अडचणी निर्माण होतात. मनपाच्या नळांना पाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये गल्लीबोळातून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने पायी चालणार्‍या व दुचाकीवरून जाणार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ड्रेनेज मध्ये जाणारे घरातील सांडपाणी पाणी हे एकत्रित जात असल्याने चेंबर चोकप झाल्यानंतर बिकट समस्या निर्माण होत असते.प्रशासनाने या सर्वांकडे लक्ष द्यावे.

- चेतन कोथमिरे

प्रभाग 31 मध्ये असलेल्या आर.के. लॉन्स, दामोदरनगरपर्यंत वर्दळीच्या असलेल्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण होऊन डांबरीकरण होणे गरजेचे आहे. त्यातच व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात दुकाने याठिकाणी लागत असल्याने वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते.

- अमोल राऊत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com