कळवण । प्रतिनिधी

कळवण तालुक्यातील मार्कंड पिंप्री येथील हेमाडपंथी शिवमंदिराची दुरवस्था झाली आहे. या मंदिराच्या देखभालीकडे पुरातत्व विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या मंदिराची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख डॉ. पंकज मेणे यांनी पुरातत्व विभागाला दिला आहे. याबाबत महाविकास आघाडीचे आमदार नितीन पवार यांना निवेदन दिले आहे.

तालुक्यातील आराध्यदैवत साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवी व मार्कंडेयऋषीच्या पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या मार्कंडपिंप्री येथे हेमाडपंथी शैलीत बांधलेले पुरातन शिवमंदिराची दुरवस्था झाली आहे. मंदिराचा बराचसा भाग ढासळला असून दगडी खांब निखळून पडत आहे. मंदिराचे सर्वच भाग जीर्ण झाल्याने कोणत्याही क्षणी मंदिर जमीनदोस्त होणार आहे.

मंदिर मोडकळीस आले असतांना मंदिरात मात्र शिवलिंग अजूनही शाबूत आहे. या मंदिराकडे पुरातत्व विभागाने या मंदिराची देखभाल करणे गरजेचे आहे. या मंदिरात महाशिवरात्र तसेच सोमवती अमावस्याच्या दिवशी मर्कंडेय पर्वतावर दर्शनासाठी येणारे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आवर्जून भेट देत असतात. तालुक्यातील ह्या हेमाडपंथी मंदिराचा अनमोल ठेवा इतिहासाची साक्ष देणारा असलयाने पुरातत्व विभाग व महाराष्ट्र शासनाने या मंदिराची देखभाल करून या मंदिराला गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख डॉ.पंकज मेणे यांनी केली आहे.

आठबे येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या शिक्षकांनी व संस्थेचे उपाध्यक्ष भूषण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी मार्कंडपिंप्री येथील हेमाडपंती मंदिराच्या संपूर्ण परिसराची साफसफाई केली आहे. मंदिराच्या दर्शनी भागाला रंगरंगोटी केली असून मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाणार्या रस्त्यावर मुरूम टाकला आहे. परिसरातील झाडांना पांढरा व विटकरी रंग दिला आहे.

सप्तशृंगगड, धोडप किल्ला, रावळ्या जावळ्या, कन्हेरगड, चाचेर किल्ला, देवळी कर्हाड व मार्कंडपिंप्री येथील हेमाडपंथी शिवमंदिर या सर्व ऐतिहासिक ठिकाणांची दुरुस्ती देखभाल करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास विभागाचा विशेष निधी मिळविण्यासाठी मुंबई येथे पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहे.

अंबादास जाधव - शिवसेना तालुकाप्रमुख