रोगराईमुळे डाळिंब संकटात

उत्पादकांना सल्ल्यासाठी शास्त्रज्ञांचा परिसंवाद : भुसे
रोगराईमुळे डाळिंब संकटात

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

डाळिंबासारख्या (Pomegranate) नगदी पिकामुळे शेतकर्‍यांची (Farmers) प्रगती होत असली तरी यावर येणारे तेलकट डाग, मर रोग, फुलगळ सारख्या रोगांमुळे डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडत आहे. या रोगराईवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय डाळिंब परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून तज्ञांचे मार्गदर्शन उत्पादकांना निश्चित मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी येथे बोलतांना व्यक्त केला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डाळिंब बागायतदार संघ व आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सातमाने येथे रविंद्र पवार यांच्या शेतात आयोजित राज्यस्तरीय डाळिंब पीक परिसंवादात मार्गदर्शन करतांना कृषिमंत्री भुसे बोलत होते.

आ. दिलीप बोरसे, रामचंद्रबापू पाटील, कृउबा सभापती राजेंद्र जाधव, मामको चेअरमन राजेंद्र भोसले, कृषि अधीक्षक विवेक सोनवणे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, अरूण देवरे, खेमराज कोर, नानाजी दळवी, शक्ती दळवी, सरपंच भगवान पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध संशोधनाने शेतकर्‍यांच्या उत्पादनात क्रांतीकारकबदल घडून आले आहे. नगदी पिक असलेल्या डाळीबावर तेल्या, मर आदी रोगांचा प्रादुर्भाव शेतकर्‍यांची चिंता वाढविणारा ठरला आहे. त्यामुळे डाळिंब परिसंवादामधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास भुसे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

फळपिक विमा योजनेमध्ये काही बदल करणे गरजेचे असून त्याअनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच डाळिंबावर मोठ्या प्रमाणात संशोधन होण्याच्या दृष्टिकोनातून राहुरी आणि लखमापूर येथील संशोधन केंद्रामध्ये आवश्यक साधन सामग्रीसाठी लागणारा निधी पुढील महिन्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.

कृषी विभागामार्फत 2020-22 पर्यंत राज्यभरात लहान-मोठ्या अशा जवळपास 1 हजार प्रकल्पांना मान्यता देवून शेतकरी बांधवांना पाठबळ देण्याचा मानस राज्य शासनाचा असल्याची भावना व्यक्त करताना भुसे पुढे म्हणाले की, राज्यात फळे व भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. परंतु यावर प्रक्रिया होण्याचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेवून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबर वाया जाणारा शेतमालावर उपाययोजना करण्यासाठी मुल्यवर्धन अनिवार्य आहे.

यासाठी राज्यात कृषी आयुक्तालय पुणे येथे स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना करण्यात आल्याची माहिती दिली.विभागनिहाय विकेल ते पिकेल या संकल्पनेतून शेतकर्‍यांचे उत्पन्नवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचे काम विशेष टास्क फोर्सच्या माध्यमातून करण्यात येईल. या टास्क फोर्समध्ये निवडण्यात आलेल्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून यामध्ये शेतकर्‍याने एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कसा पिकवावा याबाबत सखोल मार्गदर्शन शेतकरी बांधवांना मिळणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ बाबासाहेब गोरे यांनी रासायनिक खताचे दुष्परिणाम व त्यामुळे जमिनीची खराब होणारी पोत ही पुढील पिढीसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांनी रासायनिक खतांपेक्षा सेंद्रीय व जैविक खतांचा वापर करण्याचे आवाहन केले. राज्यभरात सेंद्रीय पध्दतीने रोगमुक्त रोपांच्या नर्सरी उभारणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी प्रास्ताविक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com