कसमादेला डाळींब शेती वरदान : डॉ. गोरे

खतांच्या योग्य नियोजनाची आवश्यकता
कसमादेला डाळींब शेती वरदान : डॉ. गोरे

लखमापूर । वार्ताहर Lakhmapur

भारतात सर्वत्र डाळिंब शेती (Pomegranate farming)केली जाते. परंतु दर्जेदार व जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणारे उत्पादन सांगली, सातार्‍यानंतर कसमादे परिसरातच होत असल्याने डाळिंब शेती कसमादेला निसर्गाने दिलेली देणगीच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ डाळिंबतज्ज्ञ डॉ. बी.टी. गोरे (Pomegranate expert Dr. B.T. Gore)यांनी येथे केले.

कसमादेतील ( Kalwan, Satana, Malegaon )डाळिंबाचे क्षेत्र विविध समस्यांमुळे कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकरी व माजी सरपंच शक्ती दळवी यांनी कसमादेत डाळिंब शेती पूर्ववत होण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना डाळिंबतज्ज्ञ डॉ. गोरे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य प्रशांत बच्छाव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, मविप्रचे माजी उपसभापती नानाजी दळवी, दिलीप दळवी, केवळ दळवी, दीपक जाधव, रमेश पवार, वसंत निकम, संजय देवरे, अशोक पाटील, प्रवीण भामरे, अरुण दळवी, वाय.जी. मोरे, संजय निकम आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोरे यांनी पाण्याचे अयोग्य नियोजन, रासायनिक व विद्राव्य खतांचा अतिरेकी वापर वाढल्यामुळे शेतकरीच डाळिंब शेती नष्ट करण्यास जबाबदार असल्याचे सांगितले. कसमादेत पूर्वीसारखीच डाळिंब शेती फुलवता येऊ शकते. मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून नियोजन केल्यास, माती व जमिनीचा पोत बघून डाळिंबाची लागवड केल्यास डाळिंबाची शेती शंभर टक्के यशस्वी होऊ शकते. त्यासाठी माती, मूळ, खोड, पाने, फळांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबाबत डॉ. गोरे यांनी सखोल मार्गदर्शन केले.

रासायनिक व विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर, योग्य फवारण्या, फवारणीचे वेळापत्रक याबाबतही डॉ. गोरे यांनी मार्गदर्शन केले. डाळींबबागांसाठी आवश्यक सूर्यप्रकाश कायम ठेवण्यासाठी लागवडीचे अंतर व जमिनीचा पोत बघून वापसा पद्धतीने पाण्याचे नियोजन केल्यास रोग व किडीचे नियंत्रण करणे सोपे होईल, असेही डॉ. गोरे यांनी सांगितले. चार तासांच्या या चर्चासत्रात कसमादे परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

द्राक्ष बागायतदार संघाप्रमाणे कसमादेतील डाळींब उत्पादकांसाठी डाळींब बागायतदार संघ स्थापन होणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र पाटील यांनी मांडले. या संकल्पनेचा या व्यासपीठाच्या माध्यमातून कसमादेतील डाळीब उत्पादकांनी डाळींब बागायतदार संघ स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. डाळींब उत्पादक संघाच्या माध्यमातून डाळींब उत्पादकांच्या समस्या, अडचणी व विक्रीसंदर्भातील प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.

शक्ती दळवी; डाळींब उत्पादक, लखमापूर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com