
सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar
‘स्टाईस’ मध्ये सत्ता आल्यानंतर वसाहतीच्या संपूर्ण परिसराला संरक्षक भिंत (Protective wall) बांधण्यासह अनेक चांगली कामे करण्यात आली. मात्र, संचालक मंडळातीलच काहींनी यात राजकारण (politics) आणल्याने वसाहतीच्या विकासाचा वेग मंदावल्याचे प्रतिपादन वसाहतीचे माजी संचालक, माजी सरव्यवस्थापक नामकर्ण आवारे यांनी केले.
स्टाईसच्या पंचवार्षिक निवडणुकीतील (election) आवारे-चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली सहकार उद्योग विकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित छोटेखानी सभेत ते बोलत होते. वसाहतीच्या परिसरातील वाढत्या चोर्यांमुळे उद्योजक (Entrepreneur) त्रस्त होते. भंगार गोळा करण्याच्या नावाखाली वसाहतीत येणार्यांपासून अगदी चारचाकी ट्रक घेऊन येणारेही वसाहतीतील बंद उद्योगांवर डल्ला मारत होते.
उद्योजकांच्या इमारतीचे दरवाजे खिडक्यांपासून, अगदी खिडक्यांचे गज कापून नेण्यापर्यंत चोरांची मजल गेली होती. तर काही चोरांनी थेट उद्योगाची मशिनरी ट्रकमध्ये टाकून चोरुन नेल्याचेही प्रकार घडत होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वसाहतीतील कामगार उद्योजकांना लुटून त्यांचे पगाराचे पैसे, मोबाईल लुटले जात होते. सत्ता येताच उद्योजकांच्या आग्रहाखातर संरक्षण भिंत बांधण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात केली. ही भिंत बांधून तयार झाली, त्यापूर्वीच वसाहतीच्या तीन मुख्य रस्त्यांच्या प्रवेशद्वारावर येणार्या जाणार्या वाहनांची नोंद ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, फक्त सत्तेच्या खुर्चीचे भुकेले असलेल्या काही महत्वाकांक्षी संचालकांनी या कामात राजकारण (politics) आणत होणार्या कामात खो घातला व सीसीटीव्ही (CCTV) बसवण्यास नकार दिला, सुरक्षारक्षक नेमण्यासह प्रवेशद्वाराचे काम बंद पाडले. मात्र, त्याचवेळी संरक्षक भिंतीमुळे थांबलेल्या चोर्यांकडे त्यांचे लक्ष गेले नाही. संरक्षक भिंतीमुळे चोर्या थांबण्याबरोबरच उपरस्त्यांनी पळण्याचे मार्गही बंद झाले. पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला. संस्थेच्या स्थापनेपासून गेल्या 33 वर्षापासून उद्योजक चोर्यांच्या प्रकारामुळे हैराण होते.
वसाहतीतल्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकासह सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras) बसवले गेले असते तर चोर्यांचा विषय कायमचा बंद झाला असता. वसाहतीत रात्री येणार्या जाणार्या कामगारांना, उद्योजकांना संरक्षण मिळाले असते. सर्व वसाहत भयमुक्त बनली असती.
या सर्व कामाचे श्रेय आवारे यांना मिळेल, केवळ एवढ्या असुयेपोटी आमच्याच बरोबर असणार्या चार-पाच संचालकांनी, पदावर बसवल्याचा गैरफायदा घेत या विषयांना विरोध केला व काम थांबवण्यास भाग पाडले. ज्या कामांचे सूचक म्हणून आधी सह्या केल्या होत्या, त्याच कामांना विरोध करुन या संचालकांना उद्योजकांची व त्यांच्या उद्योगाची किती काळजी आहे हेही त्यांनी दाखवून दिले आहे.
उद्योजक व उद्योगांच्या विकासापेक्षा त्यांना स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा असून स्वतंत्र पॅनल उभे करून उद्योजकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम त्यांनी सुरु केले असल्याचा टोला आवारे यांनी मारला. कुठलेही काम कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसेल तर अशा कामात मी कधीही हात घालत नाही. हे मला ओळखणारे सर्व उद्योजक जाणतात. त्यामुळे संरक्षक भिंतीसाठी खर्च झालेला एक रुपयाही वाया गेला नाही व मी वाया जाऊ देणार नाही असे आवारे यांनी स्पष्ट केले.