कृउबा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान

मतदानाच्या अधिकाराकडे शेतकर्‍यांचे लागले लक्ष
कृउबा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान

सटाणा । श्रीकांत रौंदळ Satana

राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक ( APMC Elections ) कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर येथील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची ( Satana APMC )निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची प्रक्रिया सात सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली असून निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीकरिता बाजार समिती क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची यादी 27 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे आदेश संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.

याशिवाय बाजार समिती क्षेत्रातील परवानाधारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेशही संबंधित बाजार समित्यांना देण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी 7 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

निवडणूक निर्णय अधिकारी 23 डिसेंबर 2022 रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत. त्या अनुषंगाने नामनिर्देशनपत्र दाखल करणे 23 ते 29 डिसेंबर 2022, नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 डिसेंबर 2022, छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची प्रसिद्धी_ 2 जानेवारी 2023, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी 2 ते 16 जानेवारी 2023, निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करण्याचा दिनांक 17 जानेवारी 2023 आहे. तर 29 जानेवारी रोजी मतदान होणार असून 30 जानेवारी 2023 रोजी मतमोजणी होऊन लगेच निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, तीन महिन्यानंतर होऊ घातलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्यासाठी बाजार समितीचे माजी चेअरमन शिवाजी रौंदळ, शैलेश सूर्यवंशी, पं.स. माजी उपसभापती वसंत भामरे, ज्ञानेश्वर देवरे, संजय सोनवणे, संजय वाघ, शिवसेना जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, साहेबराव सोनवणे, विशाल सोनवणे, मनोहर देवरे, भिका नाना सोनवणे इत्यादी इच्छुक असल्याची चर्चा आहे. दरम्यान सर्व शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही याबाबत अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसल्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com