करोना लसीकरणात राजकीय वशीलेबाजी

उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ ; ग्रामिण भागातही तक्रारी
करोना लसीकरणात राजकीय वशीलेबाजी

सिन्नर । Sinnar

सिन्नर शहरासह ग्रामिण भागात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसिकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने रितसर नंबरला उभे राहून लसिकरणाची वाट पाहणारांचा या वशीलाबाजीने मात्र चांगलात संताप होत आहे. याच कारणावरून सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात आज (दि. 16) काहीशी गौधळाची स्थिती बघावयास मिळाली.

कारोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने बिघडलेली परिस्थिती आणि सुटत चाललेला संयम चिंतेचा विषय आहे. अशातच डोळ्यासमोर वशीलेबाजी होतांना दिसत असल्याने नियमांत चालणारांचा मात्र संताप अनावर होत आहे. कारोना लसिकरणासाठी सिन्नर ग्रामिण रुग्णालयातील लसिकरण केंद्रावर सद्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

लस टोचून घेण्यासाठी आलेले नागरिका तास-तास रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची वाट बघत असतात. मात्र काही राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपाने रांगेत उभे असलेल्या व्यक्तींना डावलून वशीला मिरवणार्‍या व्यक्तींना प्राधान्य दिले जात असल्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे रांगेत उभे असलेल्यांचा संताप अनावर होत अनेकवेळा लसिकरण केंद्रावर गोंधळाची स्थिती उत्पंन्न होत आहे.

एकीकडे आरोग्य विभागाचे अपुरे मनुष्यबळ आणि वाढता ताण यात यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यात राजकीय हस्तक्षेपाने या आरोग्य कर्मचार्‍यांना थेट आदेश येत असल्याने हे कर्मचारी वशील्यावाल्याचे ऐकावे की रांगेत उभे असलेल्यांना प्राधान्य द्यावे अशा द्विधावस्थेत सापडत आहेत.

याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या असतांना शुक्रवारी त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण प्रक्रिया सुरू असताना प्रचंड गोंधळाचे वातावरण झाले होते. लशीलेबाजीमुळे अगदी बाचाबाची आणि शिवीगाळ पर्यंत प्रकरण गेल्याने तो चर्चेचा विषय ठरला. अशा परिस्थितीत केवळ आरोग्य व्यवस्थेला दोष देऊन चालणार नाही तर, या वशिलेबाजी करणार्‍या घटकांचा बंदोबस्त केला तरच ही प्रक्रिया सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ग्रामिण भागातही वशिलेबाजी

सिन्नर शहरातील ग्रामीण रुग्णालयात 2 , शिवाजीनगर येथे 1 आणि नगरपालिका दवाखान्यात 1 अशा चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र, 12 आरोग्य उपकेंद्र अशा एकूण 22 केंद्रांवर कोरोनाचे लसीकरण सुरू आहे.

याठिकाणी 45 वर्षावरील सर्वांना कोरोना लसिकरण देण्यात येत आहे. मात्र असे असतांना काही राजकीय आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या वशिल्याने 45 वर्षाखालील व्यक्तींना देखील कारोनाची लस देण्यात येत असल्याने खरे लाभार्थी लसिकरणापासून दुर राहत असल्याचा आरोप ग्रामिण भागातून होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com