सुरगाणा । Surgana (वाजीत शेख)

केवळ निवडणुका आल्या की मेळावे, बैठका घेण्याचा प्रघात मराठी मुलखाला आता नवीन राहिलेला नाही.

जनमाणसाच्या वेदनांकडे गांभीर्याने पाहण्याची संवेदनशीलता केव्हाच गमावलेल्या राजकीय पक्षांतील संधिसाधूपणा आता सर्वश्रुत झाला आहे. आतादेखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना जाग यायला प्रारंभ झाला आहे.

मग डोळ्यांवरील कुंभकर्णी निद्रा बाजूला सारत कामाला लागण्याची वृत्ती जागायला लागल्यास सामान्य जनतेला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पाच वर्षांपूर्वी सुरगाणा नगरपंचायतीत तब्बल बारा जागांचे दान पदरात पाडत सत्तेमध्ये आलेल्या भाजप - शिवसेना यांची मित्रपक्षांची सत्ता होती.

मात्र काही काळानंतर मित्रपक्षांत कुरबुरी वाढल्याने भाजपच्या तीन नगरसेवकांनी बंडखोरी करून माकपशी हातमिळवणी केली. त्यामुळे सुरगाणा नगरपंचायतीवर कब्जा केला. सुरगाणा नगरपंचायतीवर पुनश्च कब्जा करण्याची स्वप्ने पडत आहेत. स्वप्ने जरूर बघावीत मात्र त्यामधील व्यवहार्यतेकडे दुर्लक्ष केल्यास ते केवळ रंजन ठरते. नेमके कोणते गणित सामोरे ठेऊन भाजप, सत्तापटलावर विराजित होण्याचे समीकरणे मांडत आहे हा प्रश्न आहे. तथापि सुरगाण्याचा गड स्वबळावर प्राप्त करणे तितकेसे सोपे नाही.

नुसती गढी प्राप्त करायची असली तरी सर्वच राजकीय पक्षांना घाम गाळावा लागेल, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. स्थानिक नेत्यांमधली सुंदोपसुंदी पक्षाला घरघर लावणार्या प्रमुख कारणांपैकी एक ठरली. सुरगाण्यातील आजच्या राजकीय चित्रावर दृष्टिक्षेप टाकला तर तुलनेत खूप काही बदल आढळून येतात. आगामी निवडणूक सत्ताधारी माकपसाठी जेवढी प्रतिष्ठेची असेल तेवढीच ती माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक असेल.

यावेळी मात्र महाविकास आघाडीचा शंख एकत्रित वाजल्यास भाजप एकाकी खिंडीत पकडला जाईल. म्हणूनच आगामी नगरपंचायत निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या बाबी लक्षात घेता स्वबळावर निवडणूक जिंकण्याचे ध्येय उराशी ठेवल्यास माकप, शिवसेना, भाजपला म्हणावे तेवढे पूरक वातावरण राहिलेले नाही, असाच निष्कर्ष काढावा लागेल. मात्र स्थानिक नेतृत्वाबाबत पक्षामध्येच संदेह आहे.

केवळ निवड-नियुक्त्यांपुरते माध्यम दर्शन देण्यावाचून कोणतेही रचनात्मक कार्यक्रम पक्षाला सुचलेले नाहीत. पक्षातील मतभेद इतक्या टोकाला पोहोचले असताना उद्याची लढाई लढताना त्याचे प्रत्यंतर आल्यावाचून राहणार नाही. निवडणुकीत दखलपात्र कामगिरी करायची झाल्यास पंचतारांकित राजकारण करणे जनता खपवून घेत नाही.

ज्यांच्या जिवावर निवडणुका जिंकणे आणि खुर्च्या उबवणे शक्य असते त्या जनता जनार्दनाशी प्रतारणा केल्याचे फळ काय मिळते, याचे दाखले आजवरची राजकीय पाठ्यपुस्तके चाळल्यास मिळू शकतात. माकप, शिवसेना, भाजपसहित सुरगाणा नगरपंचायत जिंकण्याची स्वप्ने पाहणार्या इतर राजकीय पक्षांना हे शाश्वत सत्य नाकारून चालणार नाही.