नाशिक । Nashik

31 डिसेंबरला नववर्षाचे स्वागत घरीच साजरे करा असे आवाहन पोलीसांनी केले असून मद्यपींवर पोलीसांची कडक नजर राहार आहे.

तसेच या रात्री शहरात येणार्या सर्वच प्रमुख रस्त्यावर वाहन तपासणी करण्यात येणार असून, ग्रामीण भागात पार्ट्या करून शहरात येणार्यांना पोलिसांच्या चौकशीचा सामाना करावा लागणार आहे.

यंदा करोनाचा पार्श्वभूमीवरही 31 डिसेंबरचा उत्साह कायम असला तरी त्यास रात्रीच्या संचारबंदीने अधिक आडकाठी केली आहे. शहरात रात्रीची संचारबंदी लागू असून, ठिकठिकाणी तपासणी होत असते. दरवर्षी सर्व हॉटेल्स पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत सुरू असतात. यंदा हॉटेल्सच 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

सार्वजनिक व मोठ्या पार्ट्यांना बंदी घालण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहर पोलिसांना दिलासा मिळाला आहे. रात्रीची संचारबंदी 4 जानेवारीपर्यंत लागू असणार असून, नियमांचे पालन करण्यासाठी शहरात मध्यरात्रीनंतर काही ठिकाणी फिक्स पाँईट लावून वाहने तपासली जाणार आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असून, ती 31 डिसेंबरला कायम असणार आहे. त्यासाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला आहे. हाच बंदोबस्त त्या दिवशीही कायम राहणार आहे. नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासन करत आहे. शहरात घरातच सेलेब्रेशन होण्याचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

दरम्यान, दरवर्षी 31 डिसेंबर रोजी पोलिसांचा मोठा फौजफटा तैनात करावा लागतो. चायनीज व इतर छोटी मोठी खाद्य पदार्थांची विक्रीही पोलिस थांबवतात. या वेळेत हाणामारी, अपघात यासारख्या घटना होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येते.

यंदा मात्र, करोनाची पार्श्वभूमी असून, संचारबंदी नियम व नागरिकांचीही गर्दीत न जाण्याची भुमिका यामुळे यंदाचे नववर्ष स्वागत ‘घरगुती’ पद्धतीने होण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात संचार बंदी लागू नसून, शहरातील हौसी नागरिक तिथे जाण्याची शक्यता आहे.

या हौसी मंडळीना रोखण्यासाठी शहरात येणार्या सर्वच प्रमुख रस्त्यावर तपासणी नाके असणार आहेत. तर मद्य सेवन करून वाहन चालवणारांवर पोलीस कड कारवाई करणार आहेत.