पोलीस ठाणेनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा

पोलीस ठाणेनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पोलीस स्टेशननिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा (Police station wise Disaster Management Plan)तयार करून पूर परिस्थितीतील प्रमाणित कार्यपद्धतीचे व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच जूनच्या पहिल्या दिवसापासून 24 बाय 7 आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (District Disaster Management)प्राधिकरणाने पोलीस यंत्रणांना कळविले आहे.

या निर्देशान्वये धोक्याच्या ठिकाणी पर्यटकांना सेल्फी काढण्यास मज्जाव करण्यासाठी धोके व जोखमीच्या ठिकाणी नो सेल्फी झोन जाहिर करणे, पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांची व भाविकांची माहिती नियंत्रण कक्षाला उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला नोंद ठेवण्यात यावी.

मान्सून काळात शहरातील सोमेश्वर धबधबा, नांदूरमधमेश्वर बंधारा व इतर पर्यटन स्थळी होणार्‍या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व आराखडा तयार करण्यात यावा. अतिवृष्टीमुळे रस्ता खचणे, दरड कोसळणे, पाझर तलाव गळती, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, पूर पाहण्यासाठी गर्दी,इमारत कोसळणे इत्यादी संभाव्य घटनाप्रसंगी गर्दी नियंत्रणासाठी मनुष्यबळ घटनास्थळी तैनात करणे या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पोलीस यंत्रणांना कळविले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळविल्यानुसार, जूनच्या पहिल्या दिवसापासून 24बाय7 आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करून त्यामध्ये सक्षम कर्मचारी वर्गाची नियुक्ती करावयाची आहे. नियुक्त कर्मचार्‍यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात यावे. दूरध्वनी, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, फॅक्स, इंटरनेट, प्रिंन्टर्स, संगणक व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा, जीवनरक्षकांची यादी, पोहणारे, गिर्यारोधक, पक्षी मित्र, सर्पमित्र यांची दूरध्वनी यादी अद्यावत ठेवण्यात यावी. यासोबतच आपत्ती प्रवण क्षेत्राचा नकाशा यासह स्थापित नियंत्रण कक्ष सुसज्ज ठेवण्याबाबत कळविले आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशननिहाय तयार केलेले आपत्ती व्यवस्थापन आराखडा व आदर्श अंमलबजावणी पद्धत तयार करून त्याची एक प्रत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करावयाची आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांचा संपर्क क्रमांक व इमेल सुध्दा या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयास सादर करण्याची व्यवस्था करावयाची आहे.

यासोबतच मान्सून काळात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीचा (ट्रॅफिक) आराखडा व प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे, ठिकठिकाणी बॅरिकेटस उभारणीची व्यवस्था करणे, बंदोबस्तास्थासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून नोडल अधिकारी नियुक्त करणे, हवामान विभाग व जिल्हा नियंत्रण कक्ष यांच्याकडून वेळोवळी मिळणारा सतर्कतेचा संदेश संबंधीत पोलीस स्टेशन यांना माहिती देणेकामी योग्य यंत्रणा कार्यान्वित करून नागरिकांनाही याबाबत माहिती प्राप्त होईल अशी कार्यवाही करावयाची आहे. मान्सून काळात आवश्यक शोध व बचाव साहित्य व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ याचा आराखडा, पुरेसे मनुष्यबळ, प्रमाणित कार्यपद्धती महत्वाचे संपर्क अधिकारी यांची माहितीही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण कार्यालयास उपलब्ध करून द्यावयाची आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com