अवैध बायोडिझेल निर्मितीच्या साठ्यावर पोलिसांची धाड; एक कोटीचे इंधन जप्त

अवैध बायोडिझेल निर्मितीच्या साठ्यावर पोलिसांची धाड; एक कोटीचे इंधन जप्त

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील जानोरी (Janori) येथील औद्योगिक वसाहतीत (Industrial Estate) एका बायोडिझेल (Biodiesel)निर्मिती कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत १ कोटी १ लाख रुपयांचा अवैध डिझेल सदृश्य ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थाचा साठा जप्त (Sezied)केला आहे...

याबाबत अधिक वृत्त असे की, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Superintendent of Police Shahaji Umap) यांनी सध्या जिल्हाभर अवैध धंद्याविरोधात मोठी शोध मोहीम राबवली आहे. दिंडोरी तालुक्यातील जानोरी शिवारातील औद्योगिक वसाहतीत एका पत्र्याच्या शेडमध्ये बायोडिझेलचा अवैधसाठा (Illegal stock) असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह जानोरी येथे औद्योगिक वसाहतीत गट नंबर ५९९/३ च्या प्लॉट नं.१६ मधील कान्हा इंटरप्राईजेस या एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम अवैधरित्या डिझेल सदृश्य पदार्थांमध्ये एक ज्वलनशील पदार्थाची भेसळ करत असताना रंगेहात पकडले.

यावेळी संशयित आरोपी ( १) अनिल भवानभाई राधाडिया (वय ३७) रा.सुरत, गुजरात ( २) दीपक सूर्यभान गुंजाळ (वय ४१) रा. प्लॉट नंबर १३ आर्या हाईट्स, कोणार्क नगर, नाशिक (३) इलियास सज्जाद चौधरी ( वय ४३) वाहनचालक रा. कुर्ला कलिना मेहबूब चाळ, रूम नंबर १५ रा. सोना ता. तारागंज, जिल्हा, गोंडा उत्तरप्रदेश (४) अब्रार अली शेख वय (३७) क्लीनर रा. शिवडी, मुंबई (५) अजहर इब्रार हुसेन अहमद (वय २१) रा. नरसिंग गड, ता. राणीगंज जि. प्रतापगड उत्तरप्रदेश मिळून आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे सर्वजण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गिनॉल -1214/30 H C बल्क नावाचे केमिकल व MADSO B80 या नावाचे केमिकल विनापरवाना बेकायदेशीर पेट्रोलियम विभागाचा कोणताही आवश्यक तो परवाना न घेता तसेच मानवी जीवनात धोका पोहोचल अशा रीतीने एकत्रित रित्या मिश्रण करून त्यातून डिझेल सारख्या ज्वलनशील पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करत असल्याचे मिळून आले.

यावेळी त्यांच्या ताब्यातून केमिकलने भरलेले दोन टँकर क्रमांक जीजे १२ बी.झेड ८८२५ आणि एमएच ४३ बीजे ७९६७ व प्लॅस्टिक टाक्या भरलेल्या ज्वलनशील पदार्थांसह इतर साहित्य असा एकूण १ कोटी १ लाख ६८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच सदर संशयितांविरुद्ध दिंडोरी पोलिसात अवैधरित्या डिझेल सारखा सदृश्य ज्वलनशील पदार्थ बाळगून मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Hemant Patil)यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत पाटील,संदीप जगताप, दीपक अहिरे, गिरीश बागुल, विनोद टिळे यांच्या पथकाने केली. त्यानंतर दिंडोरी पुरवठा निरीक्षक अक्षय लोहारकर, जानोरी गावचे तलाठी किरण भोये यांनी याबाबत पंचनामा केला असून घटनेचा अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे,संदीप धुमाळ करत आहेत.

जानोरी एमआयडीसीमध्ये अवैध धंद्याचा तिसऱ्यांदा पर्दाफाश

जानोरी एमआयडीसी मध्ये अनेक कंपन्या व वेअर हाऊस असून त्यामध्ये यापूर्वी देखील बेकायदेशीर गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये रेशनच्या अवैध गव्हाचा साठा जप्त करण्यात आला होता. तसेच या परिसरातील एका कंपनीत बोगस सॅनिटायझर निर्मितीचा कारखाना देखील सापडला होता.अवैध इंधनाचा साठा सापडण्याची ही तिसरी घटना असून याबाबत स्थानिक प्रशासनाला कुठलेही माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी प्रशासनाने सर्वच केमिकल कंपन्या व वेअर हाऊस यांची चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com