
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
त्रिमूर्ती चौक ते हेडगेवार नगर दरम्यान कोयत्याने १६ गाड्यांच्या काचा फोडत दहशत माजविणाऱ्या दोघा संशयितांची पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मनातून भीती जावी याकरिता धिंड काढली.हेडगेवार नगर भागात मध्यरात्री मंगळवारी दोन टवाळखोर गुंडांनी दहशत माजवीत मद्याच्या नशेत शिवीगाळ करीत, वाहनांवर राग काढत तोडफोड केली होती त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेनंतर अंबड पोलीसांनी घटनास्थळी हजर होत तपास चक्रे फिरवत संशयित जयेश हर्षवर्धन भालेराव (१९) व सूरज दिलीप चव्हाण (१९) (दोघेही रा. दुर्गा नगर, त्रिमूर्ती चौक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. होते संदीप आहेर यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता यात संदीप आहेर, रवींद्र कवटे, सोमनाथ सोनवणे, राकेश कदम, साजिद शेख, हेमंत बारके आदींसह तब्बल १६ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपींची परिसरातून धिंड काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
पोलीस वाहन त्रिमूर्ती चौकात दाखल होताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी महिला वर्गाच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांनी गाड्या तोडफोडीच्या घटना कुठे कुठे व कशी घडली हे संशयितांकडून जाणून घेतले. यावेळी पोलिसांनी नागरिकांना तुम्ही सुरक्षित आहात याची जाणीव करून दिली.