नाशिक शहर होणार कलरफुल; वाहतूक सुरळीत करण्यासाठी अशी आहे पोलीस आयुक्तांची 'संकल्पना'

नाशिक शहर होणार कलरफुल; वाहतूक सुरळीत करण्यासाठी अशी आहे पोलीस आयुक्तांची 'संकल्पना'

नाशिक | प्रतिनिधी NASHIK

गूगल मॅपचा (Google map) वापर न करता नाशिक शहरात कुठेही जाण्याकरिता कलर कोडिंग (Color Coding) द्वारे दिशा दाखवण्याचा प्रस्ताव नाशिक महानगर पालिका (Nashik municipal corporation) व स्मार्ट सिटीला (Smart City) दिला असल्याने लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याचा विश्वास पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik CP Jayant Nikenavare) यांनी व्यक्त केला....

नाशिक शहरातील माध्यमांच्या संपादकांसोबत आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांच्या तिन महिन्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिली.

यावेळी पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले की,नाशिक शहराला धार्मिक महत्व प्राप्त असल्याने येथे धार्मिक पर्यटनासाठी व नैसर्गिक पर्यटनासाठी बाहेरून लोक येत असतात. शहरातील सर्व रस्ते गुगल मॅप वर आधारित न बघता दिशादर्शक कलर कोडींगच्या सहाय्याने बघून प्रवास करणे सोपे होईल.

परिणामी, नाशिक शहर हे कलरफुल दिसून त्याचा फायदा नाशकालाच होईल. यासाठी खर्च जास्त लागणार नसून स्मार्ट सिटी अथवा मनपाने निधी दिल्यास आम्ही हि संकल्पना राबवू.

यावेळी पोलीस आयुक्तांनी सांगितले कि नाशिक शहरात अपघाताचे प्रमाण बघता सर्वेक्षण केले असता शहरातून विल्होळी ते आडगाव दरम्यान आयुक्तालयाच्या हद्दीतून २३ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग जातो येथे लेन संकल्पना राबविण्याकरिता एका पथकाची नेमणूक करून ही संकल्पना सध्या राबविणे सुरु आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pandey) यांनी हेल्मेट सक्ती करण्याकरिता पेट्रोल पंप चालकांनी विनाहेल्मेट पेट्रोल देऊ नये व दिल्यास पेट्रोल पंप चालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले होते.

या संदर्भात पेट्रोल पंप चालक उच्च न्यायालयात गेले होते. या विषयी बोलतांना पोलीस आयुक्तांनी पेट्रोल पंप चालकांनी येऊन भेटावे त्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्याबाबत सुचवले.

तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जे नियम लागू आहेत ते सर्व नियम नाशकात लागू राहतील तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता त्यावेळी नवीन अध्यादेश काढण्यात येईल असेही यावेळी पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले.

यावेळी प्रताप भोसले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कलर कोडिंग याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपायुक्त प्रशासन पौर्णिमा चौघुले,उपायुक्त गुन्हे संजय बारकुंड,सहाय्यक आयुक्त गुन्हे वसंत मोरे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com