पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच दंडुक्याच्या प्रसाद द्यावा

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचा अधिकाऱ्यांशी संवाद
पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच  दंडुक्याच्या प्रसाद द्यावा

नवीन नाशिक | Nashik

विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमवेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याच्या प्रसाद द्यावा असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले.

नवीन नाशकातील विशेष पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी माऊली लॉन्स येथे आयोजित सदिच्छा भेटी प्रसंगी संवाद साधताना ते बोलत होते.

सध्या करोणाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत काही लोक तसेच काही टवाळखोर विनाकारण रस्त्यांवर किंवा चौकाचौकात फिरतांना आढळून येत आहेत. त्यांना पोलीस प्रशासनातर्फे काठीचा प्रसाद देखील दिला जात आहे.

करोणाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण शहरात ही मोहीम राबवली जात आहे. अशातच पोलिसांसमवेत खांद्याला खांदा लावून विशेष पोलीस अधिकारी म्हणून सर्वसामान्य नागरिक कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता आपले कर्तव्य बजावतांना दिसून येत आहेत ,त्यांचे मनोबल वाढवण्याकरिता पोलीस आयुक्तांनी माऊली लॉन्स येथे विशेष पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी लॉकडाउन काही दिवसच उरला असून खऱ्या अर्थाने लॉकडाउन वाटण्यासाठी पोलिस प्रशासनासह विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी देखील समवेत असलेल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच विनाकारण फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद द्यावा असे त्यांनी सांगितले.

यासोबतच नाशकात लॉकडाउन आहे का ? आणि जर आहे तर माझ्या कार्यालयात एक व्हिजिटर आलेच कसे? यामुळे सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहाय्यक आयुक्तांनी त्याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपायुक्त पौर्णिमा चौघुले, विजय खरात, अमोल तांबे, साहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, मोहन ठाकूर, समीर शेख, सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, श्रीकांत निंबाळकर आदींसह अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, विशेष पोलीस अधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com