टायर्स चोरटा गजाआड
नाशिक

टायर्स चोरटा गजाआड

Abhay Puntambekar

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

चेन्नईतून दिंडोरीसाठी टायर घेऊन निघालेला कंटेनर सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस अवस्थेत सापडल्यानंतर १३ लाख ४६ हजारांचे १४९ टायर्स घेऊन फरार झालेल्या कंटेनर चालकाला १५ दिवसांत मुद्देमालासह ताब्यात घेण्यात सिन्नर पोलीसांना यश आले आहे.

चेन्नई येथून ४ जूलेै रोजी अपोलो कंपनीचे ७४९ टायर्स घेऊन कंटेनर क्र. एनएल 0१ / एबी ५९४० निघाला होता. मात्र, ८ तारखेपर्यंतही कंटेनर दिंडोरी येथे पोहोचला नाही. त्यामूळे कंटेनर मालकाने चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कंटेनरची जीपीएस सिस्टिम बंद केली होती तर त्याचा भ्रमणध्वनी बंद होता. त्यानंतर १२ जूलै रोजी हा कंटेनर बेवारस अवस्थेत सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईबाबा ढाब्याजवळ आढळून आला होता.

कंटेनरच्या मागच्या दरवाज्याचे सील तोडून त्यातील ७४९ पैकी छोटे-मोठे १४९ टायर्स गायब झाले होते. ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक भरत मराठे, नाशिक यांनी कंटेनर चालक संदिप दगडूबा मुंडे रा. वागदरवाडी ता. आंबेजोगाई जि. बिड याने १३ लाख ४६ हजार २६२ रुपयांच्या टायर्सचा अपहार केल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

पोलीस अधिक्षक आरती सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांनी या घटनेची दखल घेत पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांना तपासासाठी मार्गदर्शन केले. पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली भगवान शिंदे, विनोद टिळे, समाधान बोराडे यांचे पथक बीड जिल्ह्यात तपासासाठी रवाना केले होते.

चालकाच्या पत्त्यावर तो आढळून आला नाही. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने चालक संदिप मुंडे याला ठाणे जिल्ह्यातील काशिमिरा येथील जनतानगर झोपडपट्टीतून शिताफीने ताब्यात घेतले. सदर चालकाने लातूर, बीड, सोलापूर, अहमदनगर येथे डिस्काऊंटमध्ये कमी किमतीत टायर्स विकण्यासाठी दिले असल्याचे सांगत या टायर्सची विक्री केल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी चोरी गेलेल्या १४९ पैकी १४१ टायर्स हस्तगत केले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com