
देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp
देवळाली कॅम्प, भगूर परिसरातून गायींची तस्करी करणारी टोळी देवळाली कॅम्प पोलिसांच्या गस्ती पथकाने पाठलाग करून पकडली. त्यांच्याकडून गाडीतील विविध प्रकारचे इंजेक्शन व साहित्य जप्त करण्यात आले असून दोन दिवसांपूर्वी घटलेल्या घटनेनंतर पोलिसांनी केलेली कामगिरी नागरिकांना समाधान देऊन जाणारी ठरली...
देवळाली कॅम्प, भगूर परिसरात मोकाट फिरणाऱ्या गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात येत होते. नंतर गाडीमध्ये टाकून त्यांची तस्करी केली जात असे. याबाबत अनेकदा गो रक्षक संघटनांनी आवाज उठवला होता.
दोन दिवसांपूर्वी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या लगतदेखील अशाच एका गायीला गाडीत टाकून पळून नेत असल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस यंत्रणेने रात्रीची गस्त वाढवली.
त्यात काल पहाटे तीन ते चारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते, पोलीस हवालदार गोकुळ भगत, निलेश वराडे यांचे पथक गस्त घालत असताना स्टेशन रोडवरील ईगल कॅन्टीनजवळ एक पांढऱ्या रंगाची गाडी त्यांच्या निदर्शनास आली.
तिचा पाठलाग केला असता गाडीतील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. त्यानंतर त्यांनी गाडी थांबवून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये विविध प्रकारचे इंजेक्शन व इतर साहित्य आढळून आले.
इंजेक्शन हे गायींना देऊन बेशुद्ध करण्यात येण्यासाठी वापरण्यात येत असे. याप्रकरणी पोलिसांनी गाडीसह दोघांना ताब्यात घेतले आहे. लवकरच या टोळीचा तपास करून गायींची तस्करी रोखण्यात येईल, असा विश्वास देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी व्यक्त केला.