
येवला | प्रतिनिधी | Yeola
शनिवार (दि.२१ ऑक्टोबर) रोजी रात्रीच्या सुमारास येवला तालुक्यातील (Yeola Taluka) नगरसुल येथील कमोदकर वस्ती व शुक्ला वस्ती या ठिकाणी दरोडेखोरांनी (Robbers) धुमाकूळ घालत जबरी लूट केली होती. तसेच सात ते आठ नागरिकांना गंभीर जखमी केले होते. दरोड्याच्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता...
त्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून येवला तालुका पोलिसांना (Yeola Taluka Police) दरोडेखोरांना तात्काळ अटक (Arrested) करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळाचे पुरावे तांत्रिक विश्लेषण व श्वान पथकाची मदत अशी एकत्रित माहिती अभ्यासून घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या मूळबाई घाट येथून लखन जनार्दन पवार, राजू उर्फ राजेंद्र दत्तू माळी, ज्ञानेश्वर त्र्यंबक मोरे, त्र्यंबकेश्वर मोरे, गणेश वसंत माळी, शरद सुभाष माळी अशा सहा जणांना अटक केली.
दरम्यान, यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी त्यांचे इतर साथीदार संजू दादा पवार रा. नगरसुल, नामदेव नाथा गायकवाड रा. पांजरवाडी, ता.येवला आणि सोनू नानासाहेब गांगुर्डे रा. धामोरी ता. कोपरगाव अशा आणखी तिघांना अटक केली. या दरोडा प्रकरणात आत्तापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना सोमवार (दि. ३० ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.