बेशिस्त नागरिकांवर पोलीसांची कारवाई
नाशिक

बेशिस्त नागरिकांवर पोलीसांची कारवाई

मास्क न वापरणार्‍या नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणात

Abhay Puntambekar

नवीन नाशिक । प्रतिनिधी

अंबड पोलिसांनी गेल्या चार दिवसात दुचाकीवर डबल सीट फिरणे तसेच मास्क न वापरणार्‍या सुमारे अडीचशे लोकांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला असून यात मास्क न वापरणार्‍या लोकांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने करोना बाबत अद्यापही लोकांमध्ये गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

परिसरात सुरवातीला लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर जणू काय करोनाचा संसर्ग संपला, असे वातावरण तयार झाले. राज्य शासनाच्या आदेशावरून १ जुलैपासून दुचाकी वाहनावर दोन लोकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला. यासोबतच मास्क अनिवार्य असताना मास्कचा वापर न करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

अंबड पोलीस ठाण्यात १ जुलै रोजी १२ दुचाकी व २८ विना मास्क, २ जुलै रोजी १४ दुचाकी ३५ विना मास्क, ३ जुलै रोजी ३ दुचाकी व ४८ विनामास्क, ४ जुलै रोजी ९२ जणांवर कारवाई करण्यात येऊन सुमारे२३२ व १७ इतर असे २४९ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

यामध्ये मास्क न वापरता फिरणार्‍या लोकांची संख्या जास्त दिसून येत असल्याने नवीन नाशिककरांना आता करोनाचे गांभीर्य राहिले नसल्याचे चित्र आहे. एकीकडे नवीन नाशिकमध्ये रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व दुसरीकडे नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे परिसरात सध्या चिंतेचे वातावरण आहे

लोकांनी सामाजिक भान ठेवून शासकीय नियमाचे पूर्णपणे पालन करावे. पोलीस प्रशासनाचा कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु लोकांनी कायदा तोडल्यास त्यांच्यावर कारवाई होणे हे निश्चितच आहे. सरकारने लॉकडाउनच्या काळात दिलेले सर्व नियम पाळणे हे सर्वांसाठीच बंधनकारक आहे.

कुमार चौधरी, वपोनि

अंबड पोलीस स्टेशन.

Deshdoot
www.deshdoot.com