नाशिक । प्रतिनिधी Nashik

मांजाने गळा चिरल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना द्वारका परिसरात घडली होती. यामुळे शहर पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड, सातपूर यासह विविध भागात पोलिसांनी कारवाया केल्या आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने नायलॉन मांजा विक्री करणार्या किरणा दुकानादारासह घरातून या धोकादायक मांजा पुरवणार्या अन्य एकास शनिवारी बेड्या ठोकल्या. या दोघांकडून तब्बल 78 मांजाचे रिळ हस्तगत करण्यात आले.

प्रशांत लक्ष्मण दिंडे (32, रा. अमृतवन गार्डनशेजारी, तवली फाटा, पेठरोड) आणि दानिश ईसाक अत्तार (20, रा. मुलतानपुरा, मिनारा महिज शेजारी, जुने नाशिक) अशी गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.

यातील दिंडे याचे पेठरोडवरील फुलेनगर येथे प्रवीण किराणा व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. या ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट एकने छापा मारून 29 हजार 300 रुपये किमतीचे 65 मांजाचे रिळ हस्तगत केले. दिंडेविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जुने नाशिक परिसरातील संशयित आरोपी अत्तार हा घरातूनच मांजा विक्रीचे काम करत होता. पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारून त्याच्या ताब्यातील 6 हजार 500 रुपयांचे धोकादायक नायलॉन मांजाचे 13 रिळ हस्तगत केले. त्याच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात पर्यायवरण संरक्षण कायद्याच्या कलम पाचसह कलम 290, 291 आणि 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धोकादायक नायलॉन मांजामुळे हिरावाडीतील भारती जाधव या महिलेचा गळा कापून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून ठिकठिकाणी कारवाई होत आहे. एका महिलेचा प्राण गेला तरी नायलॉन मांजा विक्रीचा मोह तस्करांना सुटत नसल्याचे यातून समोर येत आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ, एपीआय महेश कुलकर्णी, एसएआय बेंडकुळे, हवालदार अनिल दिघोळे, येवाजी महाले, संजय मुळक, वसंत पांडव, नाजीम पठाण, पोलीस नाईक विशाल काठे, मोतीराम चव्हाण, रावजी मगर, शरद सोनवणे, संतोष कोरडे, युवराज गायकवाड, कॉन्स्टेबल राहुल पालखेडे, विशाल देवरे, गणेश वडजे, समाधान पवार, प्रवीण चव्हाण, नीलेश भोईर, गौरव खांडरे, प्रतिभा पोखरकर आदींनी ही कामगिरी केली.