अतीवृष्टीचा फटका; कांदा रोपांवर फिरवला नांगर

अतीवृष्टीचा फटका; कांदा रोपांवर फिरवला नांगर

खर्डे । Kharde

देवळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह कांद्याच्या रोपांची अतोनात हानी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महागड्या कांदा रोपांची मुसळधार पावसाने पुर्णत: सडल्याने रोपांवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

गुंजाळनगर नांदोरेश्वर शिवारातील रामचंद्र लहानू जाधव यांच्या शेतातील कांद्याचे रोप मुसळधार पर्जन्यवृष्टीने पुर्णत: सडले गेल्याने या रोपांवर जाधव यांना नांगर फिरवावा लागला. त्यामुळे त्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात अनेक शेतकर्‍यांना या अतीवृष्टीमुळे मोठ्या आर्थिक संकटास सामोरे जावे लागले आहे. शेतकर्‍यांनी लाल कांद्याचे महागडे बियाणे खरेदी करून रोप बनविण्यासाठी शेतात टाकले होते. उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या हातात दोन पैसे मिळत आहेत.

त्यामुळे लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याच्या दृष्टीकोनातून शेतकर्‍यांनी मिळेल तिथून व मिळेल त्या भावात कांद्याचे बियाणे खरेदी केले होते. शेतात या कांद्यांचे रोप देखील तयार केले जात होते. मात्र गेल्या आठवडयात झालेल्या अतिवृष्टीमुळे लागवड योग्य कांद्याचे रोप पूर्णतः खराब झाल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

रोपच खराब झाल्याने कांद्याची लागवड करायची तरी कशी? असा मोठा प्रश्न देखील शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

गुंजाळनगर येथील शेतकरी रामचंद्र जाधव यांनी 12 किलो कांद्याचे बियाणे 3100 रुपये प्रति किलो प्रमाणे खरेदी केले होते. मात्र पावसामुळे कांद्याचे रोप पिवळे पडून भुईसपाट झाल्याने त्यांना रोपांवर नांगर फिरवावा लागला. शेतकर्‍यांना उन्हाळी कांद्याचा थोडा दिलासा मिळाला होता त्यात निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत. त्यात 3 ते 4 हजार रुपये मोजून देखील कांद्याचे बियाणे उपलब्ध होत नाही.

रब्बी हंगामातील कांद्यामुळे दोन पैसे मिळतील या आशेवर असणार्‍या शेतकर्‍यांवर अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या कांद्याच्या रोपामुळे पाणी फिरले आहे. तालुक्यात करोनाचा उद्रेक आजही जैसे थे आहे. करोना प्रादुर्भावामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले होते. आता रोपे खराब झाल्यामुळे शासनाने आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com