कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बोगस बियाणे तक्रारींचे भरघोस पीक
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बोगस बियाणे तक्रारींचे भरघोस पीक
नाशिक

कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बोगस बियाणे तक्रारींचे भरघोस पीक

२१४ तक्रारी दाखल : महाबीज विरोधात रोष

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । कुंदन राजपूत

महाराष्ट्रात बोगस बियाण्यांमुळे पेरण्या संकटात आला असून कृषी मंत्री दादा भुसे यांचे होमपिच असलेला नाशिक जिल्हयात तक्रारींची डबल सेंच्युरी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात २१४ शेतकर्‍यांनी बोगस बियाण्यांच्या तक्रारीची नोंदवल्या आहेत.

सर्वाधिक ८२ तक्रारी महाबीज कंपनी विरोधात आहे. आतापर्यंत २८ शेतकर्‍यांना नूकसान भरपाई म्हणुन नवीन बियाणे देण्यात आली आहे. मात्र आता पावसाने दडी मारली असल्याने पेरणी करायची कशी व त्यासाठि पैसे आणायचे कोठून या गर्तेत शेतकरी सापडला आहे.

करोनामुळे शेती व शेतकरी अगोदरच संकटात आला आहे. खरीप हंगामाकडून शेतकर्‍यांना अपेक्षा होती. बॅकांचे उंबरठे झिजवुन शेतकर्‍यांनी खरीपासाठी कर्ज घेऊन पेरण्या केल्या.पण बोगस बियाण्यांनी पावसाळयात शेतकर्‍यांच्या डोळयात पाणी आणले. बोगस बियाण्यांमुळे पेरण्या वाया गेल्या.

राज्यभरात बोगस बियाण्यांच्या ५० हजारांहून अधिक तक्रारी समोर आल्या आहेत. विदर्भ व मराठवाड्यसत सर्वाधिक तक्रारींचा पाऊस असून शेतकरी बोगस बियाण्यांमुळे हैराण झाला आहे.

वाढत्या तक्रारी बघता कृषीमंत्री दादा भुसे यांनी मागे औरंगाबादला एका दुकानाला भेट देत बोगस बियाणे विक्रेत्यावर कारवाई केली होती. मात्र कृषी मंत्र्यांच्या या कारवाईला न जुमानता राज्यभरात बोगस बियाणे विक्रिचा सुळसुळाट सुरु आहे.

कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा २१४ तक्रारी समोर आल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी सोयाबीन पिकाबद्दल आहेत. त्या खालोखाल मका, टोमाॅटो, वाल या पिकांचे बियाणे बोगस निघाले असुन शेतकर्‍यांना दुबार पेरणीची कसरत करावी लागणार आहे.

निफाड, चांदवड या दोन तालुक्यात सर्वाधिक तक्रारींचा पाऊस पडत आहे. शेतकर्‍यांनी त्या विरोधात तालुका कृषी अधिकार्‍याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी २८ शेतकर्‍यांना संबंधित कंपन्यांकडुन भरपाई म्हणून नवीन बियाणे देण्यात आले आहे.

हंगाम वाया जाण्याचा धोका

पेरणीसाठी एका एकराला चार ते पाच हजार खर्च येतो. मात्र बोगस बियाणांमुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पुन्हा जमिनीची मशागत करुन नव्याने पेरणी करावी लागेल. तो आर्थिक भुर्दंड शेतकर्‍याला बसेल. शिवाय आता पावसाने दडी मारली आहे.

त्यामुळे दुबार पेरणीही संकटात सापडली आहे. ते बघता खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्हे आहेत. बोगस बियाणांमुळे हा हंगाम लेट झाल्यामुळे पुढचा रब्बीचा हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

तालुकानिहाय तक्रारी

निफाड - १६२

चांदवड - ३४

नाशिक - १०

येवला - ८

बोगस बियाणे तक्रारी

महाबीज - ८२

कृषीधन - ६०

ईगल आय - १७

ग्रीन गोल्ड - ११

ओस्वाल - ७

इतर - ३७

तालुका कृषी अधिकार्‍यांकडे बोगस बियाण्यांच्या ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यांचे पंचनामे करण्यात आले. तक्रारीत तथ्य आढळल्यावर संबधित कंपन्यांकडून शेतकर्‍यांना नवीन बियाणे देण्यात आले.
- संजीव पडवळ, जिल्हा कृषी अधिकारी
Deshdoot
www.deshdoot.com