दिंडोरी : खरीप हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात
नाशिक

दिंडोरी : खरीप हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात

कष्टाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा

Abhay Puntambekar

ओझे । वार्ताहर Oze / Dindori

ओझे व परिसरातील शेतकरी वर्गाची खरीप हंगामाची रेलचेल अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक समस्यांचा पाढा गिरवत हा हंगाम बळीराजा घेत आहे. त्यामुळे केलेल्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहे.

रब्बी हंगाम पूर्ण करताना शेतकरीवर्गाची तीन तेरा, नऊ बारा अशी अवस्था झाली होती. रब्बी हंगामास जोरदार सुरुवात करून भांडवल खर्च करून बळीराजाने रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी तयारी केली. या हंगामातील सर्व पिकांनी बळीराजाला चांगली साथ दिली. त्यामुळे शेतकरीवर्गाला या हंगामातील पिकांविषयी अपेक्षा वाढल्या. सर्व पिके जोमाने आली, मात्र बळीराजाच्या या हंगामाला अस्मानी व सुलतानी संकटाची दृष्ट लागली.

अगोदर सर्व भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागला. टोमॅटोला कमी भाव मिळाल्याने तो फेकून द्यावा लागला. कोथिंबिरीने मात्र चांगला भाव देऊन थोडाफार आधार दिला. तोपर्यंत हंगामातील द्राक्ष पीक पूर्णपणे तयार झाली. परंतु करोनाने थैमान घातल्याने शेतकरीवर्गाचे होत्याचे नव्हते करून टाकले. सर्व शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. तरी रब्बी हंगामाचा शेवट करून खरिपासाठी जोरदार तयारी सुरू केली.

नंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गाचे हे संकट टळले. अशा विविध समस्या व संकटे यांचा सामना करत दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्ग खरीप हंगामातील अंतिम कामे त्यामध्ये कोळपणी, निंदणी, पिकांना वेगवेगळ्या महागड्या औषधांची फवारणी अशी कामे पूर्णत्वास नेत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com