जंगलात वणवे रोखण्यासाठी नियोजन

जंगलात वणवे रोखण्यासाठी नियोजन

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

ऐन उन्हाळ्यात नाशिकलगत असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रांमध्ये वणवा लागू नये, याकरिता वनविभागातर्फे नियोजन करण्यात आले असून त्या ठिकाणी काही उपाययोजना देखील करण्यात आल्या असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी 'देशदूत'शी बोलतांना दिली.

नाशिक शहरालगत असलेल्या चामरलेणी,म्हसरूळ डेपो, पांडवलेणी समोरील डोंगर, चुंचाळेच्या मागील डोंगर आधी ठिकाणी उन्हाळ्यात गवत वाढल्यामुळे वणवा लागण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मात्र आतापर्यंत या ठिकाणी जे काही वणवे पेटले आहेत ते केवळ काही टवाळखोरांनी पेटवले असल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी वनविभागाकडून अज्ञात संशयितांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यांत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे घनदाट जंगल नसतांनाही वणवे पेटत असल्याने वन विभागातर्फे चामरलेणी परिसरामध्ये काही गार्ड्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यासोबतच परिसरामध्ये काही पट्टे आखण्यात आले आहेत जेणेकरून आग जरी लागली तरी ती काही क्षणात विझून इतरत्र आग पसरणार नाही. त्यासोबतच चुंचाळे परिसराच्या मागील परिसरात वनविभागाची चौकी असल्यामुळे त्या ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍यांवर लक्ष ठेवणे हे वन विभागासाठी सोयीस्कर आहे.

ग्रामीण भागात बर्‍याचदा काही शेतकर्‍यांच्या चुकीमुळे म्हणजेच ज्यावेळी ते शेतीमधील तण जाळण्याकरिता आग लावतात आणि दुर्लक्षामुळे हवा येऊन ही आग इतरत्र पसरत गेल्याने वणवा पेटल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, मात्र अशा ठिकाणी देखील शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याचे काम वनविभागातर्फे सुरू आहे जेणेे करून याठिकाणी वणवा पेटणार नाही. दिवसा जर कधी डोंगराळ परिसरात वणवा लागला तर त्याला विझवणे वनविभागासाठी सोपे जाते मात्र रात्री उशिरा जर कधी वणवा पेटला तर मात्र वनविभागाच्या पथकाला तारेवरची कसरत करून आगीवर नियंत्रण मिळवावे लागते.

टवाळखोरांची माहिती देण्याचे आवाहन

नाशकात ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे याकरिता पांडवलेणी,चामरलेणी सह त्याच्या आजूबाजूच्या डोंगरावर पर्यावरण प्रेमींनी वृक्षारोपण करत झाडांचे संगोपन केले आहे. मात्र केवळ टवाळखोरांच्या हुल्लडबाजीमुळे यापूर्वी वणवे पेटले होते अशा टवाळखोरांबद्दल कुणास काही माहिती मिळाल्यास वनविभागाशी संपर्क करावा असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com