नगरपरिषदेकडून नियोजन गरजेचे

नगरपरिषदेकडून नियोजन गरजेचे

सिन्नर | विलास पाटील Sinnar

सिन्नर (sinnar) शहर झपाट्याने वाढते आहे. शहराच्या तिन्ही- चारी बाजूंनी जाणार्‍या महामार्गामुळे शहराची कक्षा अजूनच रुंदावणार आहे. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेता बाराद्वारीतील दशक्रिया विधी परिसराच्या धर्तीवर शहराच्या विविध भागात स्मशानभूमी (Cemetery) व दशक्रिया विधी करता येतील अशा जागा नगर परिषदेने विकसित करण्याची गरज आहे.

शहराच्या दक्षिणेकडून नाशिक-पुणे महामार्गासह (Nashik-Pune Highway) समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) जातो आहे. शिर्डी महामार्गाचे (Shirdi Highway) चौपदरीकरण सुरू आहे. बारागाव पिंप्रीमार्गे जाणार्‍या निफाड (niphad) रस्त्याचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. याच रस्त्याच्या पुढे आठ-दहा किमीवरून लवकरच सुरत (surat)- चेन्नई (chennai)- हैदराबाद (Hyderabad) हा दहापदरी महामार्ग जाणार आहे. मुसळगाव वसाहतीतील बेलोटा कंपनीच्या मागच्या बाजूला नाशिक-पुणे रेल्वे स्टेशन (Nashik-Pune railway station) होणार आहे.

असा विचार केल्यास चहू बाजूने जाणार्‍या या महामार्गांच्यामध्ये सिन्नर शहर अजूनच झपाट्याने वाढणार आहे. सिन्नर- बारागाव पिंप्री मार्गे निफाडकडे जाणारा रस्ता चांगला बनताच अगदी धुळ्याहून पुण्याला जाणार्‍या खासगी आराम बसेस मध्यरात्रीनंतर याच मार्गाने सुसाट धावू लागल्या आहेत. शहर वाढले की इतर सुविधा हळूहळू येणारच आहेत.

नगरपरिषदेची हद्द पिंप्री रस्त्यावर तीन किमीच्या पुढील खिंडीपर्यंत वाढली आहे. शिर्डी रस्त्यावर मुसळगाव वसाहतीपर्यंत नगरपरिषदेची हद्द वाढली असल्याने मधला भागही लवकर उपनगरांनी व्यापला जाणार आहे. जुना नाशिक पूना रोड ते बायपासच्या मधला भागही लवकरच अशाच पद्धतीने व्यापलेला बघायला मिळणार आहे. वाढत्या सिन्नरच्या गरजा लक्षात घेता नगरपरिषदेने आतापासूनच काळजी घेणे गरजेचे आहे.

बारागाव पिंप्री रस्त्यावरील कानडी मळा, उकाडे मळ्यासह परिसरात नगर परिषदेचे पाणी पोहचल्याने निवासी घरांची संख्या वाढली आहे. पंधरा वर्षांपासून हा भाग आपला नगरसेवक निवडून देतो आहे. मात्र, या भागात कुणाचा मृत्यू झालाच तर अंत्यविधीसाठी तीन-साडेतीन किमीवरील जुन्या संगमनेर नाक्याजवळील स्मशानभूमीत जावे लागते.

आजकाल अंतिम यात्रा वैकुंठ रथातून निघत असली तरी मृताच्या नातेवाईकांना, महिलांना याच रथाच्या मागे पायी स्मशानभूमीपर्यंत जावे लागते. अशीच अवस्था शिर्डी महामार्गावरील गवळी मळ्यापर्यंत पसरलेल्या छोट्या-मोठ्या उपनगरांचीही आहे. पिंप्री रस्त्यावरही नगर परिषदेच्यावतीने स्मशानभूमी उभारणे गरजेचे बनले आहे.

कोठुरकर मळ्याजवळच्या तलावाला खेटून स्मशानभूमी उभी करण्याचा प्रयत्न सतरा-अठरा वर्षांपूर्वी तत्कालीन पंचायत समिती सदस्य सुनील कानडी यांनी केला होता. मात्र, स्मशानभूमीत मृतदेह जाळल्यानंतर वार्‍याबरोबर त्याचा धुरळा आमच्या घराकडे येईल असा आक्षेप कानडी यांच्याच हितसंबंधीयांनी घेतल्याने स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला होता. स्मशानभूमी म्हटली तर तेथे पाणी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे कानडी मळ्यातीलच एका तलावाजवळ स्मशानभूमी करण्याचाही प्रयत्न झाला होता.

या तलावात वीज पडल्याने तेथे बाराही महिने पाणी असते हाही त्यामागे विचार होता. मात्र, स्थानिकांनी तिथला प्रयत्न हाणून पाडला होता. नंतर हे तळे बुजवून तळ्यासह परिसरात प्लॉट्स विकसित करण्यात आले. हा परिसर दिवसागणिक वाढतच जाणार आहे. त्यामुळे या भागात स्मशानभूमी गरजेची बनणार आहे. या भागात स्मशानभूमीबरोबरच दशक्रिया विधीसाठीही एखादी जागा विकसित करणे गरजेचे आहे.

शहरात सध्या बारद्वारी व नागेश्वरी या दोनच ठिकाणी दशक्रिया विधी पार पडतात. नागेश्वरी, लोंढे गल्लीसह वावी वेस, गावठयावरील काही भागातील लोक दशक्रिया विधीसाठी येतात. बाकी शहरासह सर्वच उपनगरांमधील दशक्रियाविधी बाराद्वारीत पार पडतात. सरदवाडी रस्त्यावरील उपनगरापासून नायगाव रस्त्यावरील मळ्यामधील मृतांचा दशक्रिया विधी येथेच पार पडतो.

माळेगाव हे गाव औद्योगिक नगरी म्हणून देशभरात नावलौकिक मिळवून आहे. मात्र, या गावात दशक्रिया विधीसाठी शेड उभी करण्याएवढीही जागा आज उपलब्ध नाही. त्यामुळे तेथील लोक बाराद्वारीत येऊन दशक्रिया विधी पार पाडतात. अशी वेळ भविष्यात शहरातही येऊ शकते. जमिनीला सध्या मिळत असलेला सोन्याचा भाव पाहता, कुणीही दशक्रिया विधी, स्मशानभूमीसाठी जागा देण्यास तयार होणार नाही.

नगर परिषदेने पुढाकार घेऊन पिंपरी रोड, नायगाव, डुबेरे-घोटी रोड परिसरात स्मशानभूमी व दशक्रिया विधीसाठी जागा निश्चित करण्याची गरज आहे. सरदवाडी रोड व गंगा वेस भागात स्मशानभुमी असली तरी या भागातली दशक्रिया विधीसाठी जागा निश्चित करणे गरजेचे आहे. वाढत्या शहराबरोबरच तीही गरज असल्याचे ओळखून आत्तापासूनच त्यासाठी पावले उचलली तर माळेगावसारखी अवस्था सिन्नरच्या उपनगरातील रहिवाशांची होणार नाही. शेवटी जगण्या बरोबरच मृत्यूनंतरचा प्रवासही सुखकर व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com