जि.प.कामांचे नियोजन नव्या पालकमंत्र्यांच्या हाती

जि.प.कामांचे नियोजन नव्या पालकमंत्र्यांच्या हाती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad Nashik )विविध विभागांना त्यांना प्राप्त नियतव्ययानुसार केलेले कामांचे नियोजन व जिल्ह्यातील आमदारांनी सुचवलेल्या कामांच्या याद्या प्रशासनाने जिल्हा नियोजन समिती (District Planning Committee) कार्यसमितीच्या बैठकीत मांडल्या.

मात्र, त्यातील केवळ नागरी सुविधांच्या कामांना पालकमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. उर्वरित कामांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता या कामांबाबत नव्याने अस्तित्वात आलेल्या सरकारमधील पालकमंत्रीच ( New Guardian Minister)निर्णय घेतील, हे स्पष्ट झाले आहे. परिणामी जिल्हा परिषदेचे नियोजन पुढे ढकलण्यास प्रशासनाला नवीन निमित्त मिळाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी त्यांना प्राप्त नियतव्ययानुसार कामांचे नियोजन करण्यास सुरवात केली असतानाच, जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील कामांच्या याद्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे देऊन नियोजनामध्ये ही कामे समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सर्व विभागप्रमुखांनी कामांचे नियोजन केल्यानंतर आमदारांच्या यादीतील कोणती कामे निवडायची, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन मागवले.

मात्र, आमदारांनी सूचवलेल्या कामांपैकी कोणती कामे घ्यायची? विकास आराखड्यातील कोणती कामे समाविष्ट करायची, याबाबत प्रशासन काहीही निर्णय घेऊ शकले नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कार्य समितीमध्ये या सर्व कामांची यादी मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा नियोजन समिती कार्यसमितीच्या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासनाने या याद्या सादर केल्या. आमदारांनी सूचवलेल्या कामांची निवड आमदारांनीच करावी, अशी प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र, या याद्यांबाबत काहीही निर्णय झाला नाही. पालकमंत्र्यांनी या याद्यांमधील केवळ नागरी सुविधांची कामे मंजूर केली आहेत. इतर कामांबाबत काहीही निर्देश दिले नाहीत.

नियोजन बासनात गुंडाळले

आता राज्यात सत्तांतर होऊन नवीन मुख्यमंत्रीही विराजमान झाले आहेत. यामुळे या याद्यांबाबत नवीन पालकमंत्रीच निर्णय घेण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जिल्हा परिषदेचे नियोजन बासनात गुंडाळले जाणार आहे. आधीच प्रशासनाने नियोजनाबाबत धिम्या गतीने चालण्याची भूमिका घेतली असल्याने आता नवीन पालकमंत्री येईपर्यंत काहीही निर्णय होणार नसल्यामुळे ही बाब प्रशासनाच्या पथ्यावरच पडली आहे, अशी चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com