नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते दुरुस्ती कामांचे नियोजन सुरू झाले असून त्यासाठी शासन निर्णयानुसार पीसीआय व तालुकास्तरीय गुणांकनाप्रमाणे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येत आहे.

प्रस्ताव तयार झाल्यावर शासन आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी या रस्त्यांची तपासणी केली जाणार आहे. नियोजनात रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरवण्यापूर्वी संंबंधित कार्यकारी अभियंत्यांनी जास्त गुणांकन असलेल्या प्रत्येक गटातील 10 ते 15 रस्त्यांची तपासणी करून वस्तुनिष्ठता तपासावी व त्याप्रमाणे रस्त्यांचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा, अशा सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी दिल्या आहेत.

याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे बांधकाम एक, दोन व तीन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र देत या सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. जिल्हा वार्षिक योजना 2020-2021 साठी लेखाशीर्ष 3050 व 5034 अंतर्गत रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यासाठी पीसीआय मानांकनाप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवण्याचा शासन आदेश आहे. त्याचबरोबर तालुकास्तरीय गुणांकन म्हणजे मॅट्रिक्सचे गुणही त्यासाठी गृहीत धरले जातात.

या आर्थिक वर्षासाठीचे दायित्व वजा जाता उरलेल्या निधीतून दीडपट रकमेच्या प्रशासकीय मान्यता देण्याचे नियोजन करण्याचे काम बांधकाम समितीकडून सुरू आहे. या रस्ते कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवायचे असल्याने सर्व जिल्हा परिषद सदस्यांकडून रस्ते कामांच्या याद्या मागवल्या जात आहेत.

बांधकाम विभागाने ठरवलेले प्राधान्यक्रम, सदस्यांनी दिलेल्या याद्या यांच्यामधून रस्ते कामाचे प्राधान्यक्रम ठरवताना शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी तालुकास्तरीय गुणांकनामध्ये अधिक गुण मिळालेल्या रस्त्यांची कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी व दिलेले गुणांकन योग्य आहे काय, याची खात्री करावी.

त्यानंतर पीसीआयनुसार रस्त्यांचे प्राधान्यक्रम ठरवावेत, असे निर्देश शिंदे यांनी पत्रात दिले आहेत. संबंधित यादी 8 जानेवारीपर्यंत अंतिम करून बांधकाम समितीच्या सभेवर ठेवण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.