
नाशिक । प्रतिनिधी Nashik
सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे ( Rainfall )नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरातील रस्त्यांची ( Roads )वाताहात झाली आहे. संततधारेमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले( Pits on Roads) आहेत. रस्त्यांची अवस्था पाहता पाऊस आला धावून रस्ते गेले वाहून अशी म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.
शहरातील निमानी बस स्थानक, ठक्कर बाजार बस स्थानक, श्रीराम विद्यालय,पेठ रोड, तारवालानगर,राऊ हॉटेल परिसर, रविवार कारंजा यासह उपनगरातील रस्त्यांची या पावसामुळे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडीही अस्ताव्यस्त रस्त्यावर पडलेली दिसून येत आहे. यामुळे दुचाकी वाहनधारकांना आपले वाहन चालवताना मोठी अडचण येत आहे.
खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्डा आहे की नाही,हेही वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे वाहनधारक पडण्याचे चित्रही ठिकठिकाणी दिसून येत आहे. शहराचा विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो.शहराच्या विकासाची प्रचिती ही त्या-त्या शहरातील रस्त्यांवरून येत असते.मात्र,नाशिक शहरांमध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून पडत आहे.
महापालिकेने सुरू केलेल्या पावसाळी गटार योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्यात ही गंभीर स्थिती नित्याचीच झाली आहे. तुरळक पाऊस झाला तरी रस्त्यावर मोठ-मोठ खड्डे पडतात, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन फसण्याचे तसेच अपघाताचे प्रकार घडत आहेत. यामुळे वाहनांचे मेंटेनन्सही वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेच्या संबंधित विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात मुरूम आणि खडीकरण केले जाते. परंतू एका पावसात रस्त्याची पुन्हा वाताहत होते,असे चित्र नेहमीचेच झाले आहे.