पिसोरे(साबरदारा) लघु प्रकल्पाचे सर्वेक्षण होणार; आमदार दिलीप बोरसेंच्या जलसंधारण विभागाला सुचना..

पिसोरे(साबरदारा) लघु प्रकल्पाचे सर्वेक्षण होणार; आमदार दिलीप बोरसेंच्या जलसंधारण विभागाला सुचना..
Dipak

मुंजवाड | वार्ताहर

तालुक्यातील पिसोरे(साबरदरा) हा मध्यम लघु प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आमदार दिलीप बोरसे यांनी स्थानिक ग्रामस्थासह परिसरातील शेतकरी नेत्यांसमवेत या प्रकल्प स्थळाची पाहणी केली.

बागलाणच्या पश्चिम आदिवासी भागातील पिसोरे गावाजवळ असलेला हा बहुप्रतिक्षित साबरदारा प्रकल्प कार्यन्वित व्हावा यासाठी या भागातील तत्कालीन दिवंगत आदिवासी नेते झुगा माळी यांचे सह स्थानिकांची मागणी होती.

या प्रकल्पासाठी आज पर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी पुढे न आल्याने या भागातील आदिवासींना उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.हा प्रकल्प सुरू होण्यासाठी बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे, पंकज ठाकरे यांनी पुढाकार घेत आमदार बोरसे यांना प्रकल्प स्थळाची पाहणी करण्याची मागणी केल्यानंतर आज आमदार बोरसे यांनी जलसंधारण विभागाचे अधिकाऱ्या समवेत या प्रकल्पाची पाहणी करीत तात्काळ सर्वेक्षण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

असा असेल पिसोरे (साबरदरा)लघु प्रकल्प

पिसोरे गावाजवळ डोंगर रांगेत असलेल्या मोकळ्या जागेत पावसाळ्यात डोंगर रांगेतून हत्ती नदीत जाणारे पाणी अडवले जाईल साधारण ३५ ते ४० दलघफु पाणी साठवण क्षमता झाल्यास हे पाणी उन्हाळ्यात पठावे धरणात सोडून पठावे धरणाच्या कालव्या द्वारे सिंचनासाठी देता येईल .

पिसोरे(साबरदरा )मध्यम लघु प्रकल्पाचा फायदा

स्थानिक लोकांची जुनी मागणी असलेला हा प्रकल्प झाल्यास पिसोरे, मळगाव, पठावे, चिंचपाडा, मोरकुरे,तळवाडे दिगर, किकवारी खुर्द, विंचुरे, किकवारी बुद्रुक, सह विरगाव पर्यत शेतीला फायदा होऊ शकतो. या प्रकल्पाचे पाणी हे पठावे धरणात येऊन ६० दलघफु क्षमतेचे पठावे धरणाला या प्रकल्पाची जोड मिळाल्यास दोघे प्रकल्पांचा फायदा वरील गावांना होणार आहे.

पठावे धरणाचा कालवा हा तळवाडे दिगरच्या मालदरा शिवारा पर्यत आहे. पुढे जाऊन हा कालवा किकवारी विंचुरे पर्यत गेल्यास गेली अनेक वर्षे असलेली या गावाची शेती सिंचनाची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

यावेळी बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे, बागलाण भाजपाचे विधानसभा अध्यक्ष पंकज ठाकरे, प्रदीप बच्छाव उपस्थित होते यासोबत मळगाव(पिसोरे) चे सरपंच नामदेव पवार,पिसोरेचे पोलीसपाटील तुकाराम माळी, रामदास भोये, किकवारीचे सरपंच उज्वल काकुळते, उमेश काकुळते, प्रहारचे तालुका अध्यक्ष गणेश काकुळते,रवींद्र सोनावणे,विंचुरेचे सरपंच रमेश वाघ, पठावे सरपंच पंडित गांगुर्डे, विश्वास खैरनार ,जलसंधारण विभागाचे उपअभियंता प्रशांत जगताप, शाखा अभियंता तुषार गुंजाळ आदींसह परिसरातील शेतकरी, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com