जीवनचरित्र शिल्पातून उलगडला पिंगळे यांचा राजकीय प्रवास

जीवनचरित्र शिल्पातून उलगडला पिंगळे यांचा राजकीय प्रवास

पंचवटी l Panchvati (वार्ताहर) :

जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस म्हटला की, त्याच्या कायम स्मरणात राहील, अशी अनोखी भेट देण्याचे प्रत्येकजण नियोजन करतो असतो. असेच एका धाकट्या भावाने थोरल्या भावाला 'अनोखे गिफ्ट' देऊन यंदाचा त्यांचा वाढदिवस अविस्मरणीय केला.

माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे धाकटे बंधू माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांनी भव्य असे 'जीवनचरित्र शिल्प' भेट म्हणून दिले. या अनोख्या शिल्पातून पिंगळे यांचा सरपंच ते खासदार असा राजकीय जीवन प्रवास उलगडण्यात आला आहे.

गंगापूर नाक्यावरील पिंगळे यांच्या निवासस्थानी रविवारी (ता.२१) सकाळी मोजकेच मित्र आणि कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पार पडला. गोकुळ पिंगळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बंगल्याच्या आवारात हे शिल्प ठेवण्यात आले होते. पिंगळे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते फित कापून या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. यात पिंगळे यांनी सर्वप्रथम दरी ग्रामपंचायतीत भूषविलेले सरपंचपद, नाशिक सहकारी साखर कारखाना, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, शिखर बँक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, आमदार, खासदार असा राजकीय प्रवास चित्रांद्वारे रेखाटण्यात आला आहे.

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आमचे बंधूच आमच्यासाठी वडीलस्थानी राहिले आहे. त्यामुळे त्यांनी केलेला संघर्ष आणि राजकीय वाटचाल मी जवळून पाहिली आहे. त्यांचा संघर्ष, समाजसेवा, राजकारण, प्रत्येक क्षेत्रातील त्यांची निर्णायक भूमिका आमच्या कुटुंबातील भावी पिढीला समजाव्यात, यासाठी त्यांचे 'जीवनचरित्र शिल्प' बनविण्याची संकल्पना सुचली. नाशिकमधील वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओच्या सोनवणे बंधूंनी अप्रतिम शिल्प बनवून दिले.

गोकुळ पिंगळे, माजी नगरसेवक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com