पिंपळगावची रुग्णवाहिका आजारी; वारंवार तक्रार करूनही अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

रुग्णवाहिका
रुग्णवाहिका

पिंपळगाव ब.। Pimpalgaon (वार्ताहर)

परिसरासाठी देवदूत ठरणार्‍या (एमएच 14, सीएल 1399) या 108 रुग्णवाहिकेचा नोव्हेंबरमध्ये अपघात झाल्याने पाच महिन्यांपासून रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ही रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी उभी आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने पाच महिन्यांपासून अनेकवेळा संबंधित विभागास नागरिकांनी सूचना करूनही संबंधित अधिकारी याबाबत हात वर करत आहेत. कोेविडच्या काळातच पिंपळगाव बसवंत येथील 108 रुग्णवाहिकेचा अपघात झाला होता.

त्यामुळे ओझरला असणारी रुग्णवाहिका पिंपळगावचे काम करत होती. मात्र ओझरची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे सदरची रुग्णवाहिका तेथेच अडकून पडत आहे. तर पिंपळगाव बसवंतची 108 रुग्णवाहिका पाच महिन्यांपासून दुरूस्तीअभावी पडून आहे.

संबंधित विभागाने वेळोवेळी वरिष्ठांना सूचना देऊनही आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. संबंधित विभागाने बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा संबंधित रुग्णवाहिका त्वरित दुरूस्त करून रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा आर्थिक भुर्दंड थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

याबाबत पिंपळगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश धनवटे म्हणाले की, गेल्या नोव्हेंबरपासून पिंपळगाव बसवंत येथील 108 रुग्णवाहिकेला अपघात झाल्याने गॅरेजमध्ये रिपेअरिंगसाठी ठेवली आहे. अद्याप काम झाले नसल्याने परिसरात अपघात झाल्यास रुग्णांना नाशिकला उपचारासाठी नेण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.

पिंपळगाव शहराचा वाढता विस्तार विचारात घेता व येथे येणारे ग्राहक, शेतकरी, व्यावसायिक यांचा विचार करता येथील नादूुस्त असलेली रुग्णवाहिका तत्पर दुरूस्त करून तिचा लाभ सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मिळावा, यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com