घोटी | Ghoti

मुंबई – नाशिक महामार्ग क्र. ३ वर घोटी येथे पिक इन्फ्रा कंपनीचा टोल नाका आहे. या कंपनीला संपूर्ण रस्त्याची देखभालीसह दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे.

मात्र गेल्या काही काळात संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झालेली असून कसारा घाटात देखील दरड कोसळल्यानंतरचे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेली नाही. ज्याठिकाणी काम झाले आहे. त्याचा संपूर्ण दर्जा ढासळला असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे संबंधित पिक इंन्फ्रा कंपनी प्रशासनाला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने तब्बल ४ कोटी ७३ लाख ४७ हजार ७७० रुपयांचा दंड सुनावला आहे.

इगतपुरी तालुक्यात वडपे ते गोंदे दरम्यान महामार्गाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी पिक इंन्फ्रा कंपनीला देण्यात आली आहे. संबंधित कंपनीतर्फे घोटी येथे टोलनाका उभा करुन वाहनधारकांकडून टोल शुल्क वसूल केले जाते.

मात्र सदर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. या कंपनीकडून सदर रस्त्याची देखभाल करणे बंधनकारक आहे. इगतपुरी तालुक्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणात पाऊस होतो.

संततधार चालणाऱ्या पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळणेसह रस्ता वाहून जाण्याच्या घटना नियमित घडत असतात. पावसाळा संपल्यानंतर सदर दुरावस्था झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे कंपनी प्रशासनाला बंधनकारक असते. मात्र पावसाळा संपूनही सदर रस्त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही.

कसारा घाटात वारंवार दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असतांना देखील कंपनी प्रशासनाशी चर्चा करुन सदर रस्ता दुरुस्तीबाबत कंपनीला सूचना देण्यात आल्या होत्या. ठरवून दिलेल्या मुदतीत कंपीनेने काम पूर्ण न केल्यास दंड सुनाविण्याचे निश्चित झाले होते. मात्र सदर कंपनीला प्रशासनाने तीनवेळा नोटीस देवून देखील मुदतीत सदर रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झालेली नाही.

याशिवाय घाट रस्ता भागात दरड कोसळणाऱ्या संभाव्य भागात जाळी मारण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने संबंधित पीक इन्फ्रां कंपनीला पावणे पाच कोटींचा दंड सुनावला आहे.

यामुळे शहर व परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दंड सुनावला असल्याने वाहनधारकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. संबंधित कंपनी प्रशासनाने आतातरी सदर रस्त्याच्या दर्जा सुधारावा, अशी अपेक्षा वाहनधारकांनी केली आहे.

या दंडाची रक्कम तीनविभागात विभागाण्यात आली आहे. यात पहिल्या भागात ३ कोटी १९ लाख ८८ हजार ७९९ अशी तर दुसऱ्या विभागात रस्ता पूर्नरबांधणीसाठी ६३ लाख ३१ हजार २१४ रुपयांचा दंड असून तिसऱ्या विभागात रस्ता वाढीव लांबीसाठीसह नुतनीकरणाला ९० लाख २७ हजार ७५७ रुपयांचा दंड असा एकूण ४ कोटी ७३ लाख ४७ हजार ७७० रुपयांता दंड इन्फ्रां कंपनीला दंड सुनाविण्यात आला आहे.

याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने विहित मुदतीत दंड भरणा करण्याचे सुनावले असून मुदतीनंतर दंडाची रक्कम भरल्यास त्यावर दंड आकारण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.