Photo Gallery : आदिवासी भागात नागली पाककृती सप्ताह

Photo Gallery : आदिवासी भागात नागली पाककृती सप्ताह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आहारातील नागलीचा (Ragi) वापर वाढवा या उद्देशाने तीन जिल्ह्यातील ३७ आदिवासी (Tribal) गावांमध्ये नागली पाककृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते...

नागली पिकांची उत्पादकता, उत्पन्न वाढीच्या उद्देशाने कार्यरत 'प्रगती अभियान' (Pragati Abhiyan) या सामजिक संस्थेच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) संयुक्त विद्यमाने दि. 1 जानेवारी ते 7 जानेवारीपर्यंत हा सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान नागलीपासून विविध पोषक पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण आदिवासी गावांमधून देण्यात आले.

सुरगाणा (Surgana), पेठ (Peth), त्र्यंबक (Trimbak), मोखाडा (Mokhada) व शहापूर (Shahapur) या तालुक्यात हा उपक्रम झाला. प्रगती अभियान संस्थेच्या संगीता जाधव (Sangita Jadhav) यांनी स्थानिक शेतकरी गट व स्थानिक बचत गटांना नागलीच्या विविध पाककृतीचे प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षित बचत गट व शेतकरी गट यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढील पाच दिवस शिकविलेल्या पदार्थांपैकी पाच प्रकारचे पदार्थ दररोज स्थानिक अंगणवाडी, प्राथमिक शाळा किंवा आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्याना खाऊ घातले.

पूर्वीपासून भाकरीच्या स्वरूपात बघत असलेल्या नागलीचे हे वेगळे स्वरूप स्थानिकांना आवडत असल्याचा अनुभव चंद्रकांत कुवर, मोहन अवतार पाहिल्याचे या स्थानिकांनी सांगितले. नागलीचे लाडू, पेज, उपमा, बर्फी व शिरा हे पदार्थ लहानांपासून थोरांपर्यंत लोकप्रिय होताना दिसत असल्याचे ते म्हणाले.

ठाणे (Thane), नाशिक (Nashik), पालघर (Palghar) जिल्ह्यातील आदिवासी गाव पाड्यांवर नागली संवर्धन व जतन होण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून प्रगती अभियान संस्था कार्यरत आहे. संस्थेला या कार्यक्रमासाठी आदिवासी विकास विभागाचे सहकार्य लाभत असून नाशिक (Nashik), कळवण (Kalvan), शहापूर (Shahapur) व जव्हार (Jawahar) प्रकल्प कार्यालयाच्या मार्गदर्शनाने आदिवासी नागली विकास कार्यक्रम राबविला जात आहे.

आदिवासी महिला बनल्या प्रशिक्षक

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) महिला नागलीच्या नाविन्यपूर्ण पाककृती शिकून आता प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत. इतर बचतगटांना त्याचे मार्गदर्शन करीत आहेत. या सप्ताहाच्या निमित्ताने काही बचत गट व्यावसायिक दृष्ट्या नागलीवर प्रक्रिया करून मूल्य वर्धन करण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत. या उपक्रमात ५० पेक्षा अधिक महिला बचत गट व ३० शेतकरी गट एकत्र आल्याने भविष्यात नागलीसाठी एक मोठी चळवळ उभी राहून व्यावसायिक संधी निर्माण होऊ शकते.

दैनंदिन आहारात नागलीचां वापर कमी होत आहे. दररोजच्या आहारात नागलीचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने नागलीच्या भाकरी व्यतिरिक्त विविध प्रकारचे पदार्थ बनविले असता आता लहान थोर सगळेच आवडीने खाऊ शकतात हे या निमित्ताने लक्षात येत आहे. जितका आहारात वापर वाढत जाईल तितकी नागलीला मागणी वाढेल आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल.

- अश्विनी कुलकर्णी, प्रगती अभियान

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com