कांदा उत्पादक शेतकरी
कांदा उत्पादक शेतकरी
नाशिक

राज्य कांदा उत्पादक संघटनेचे फोन आंदोलन

कांदा दर प्रकरणी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

राज्यातील कांद्याला उत्पादन खर्चा पेक्षाही कमी दर मिळत असल्याने केंद्रातील व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट 20 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करून तो देशामध्ये वितरित करावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. 28) फोन आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी हे मंगळवारी 28 जूलै सकाळी 9 वाजल्यापासून केंद्रीय कृषिमंत्री मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अन्न पूरवठा मंत्री रामविलास पासवान, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सोबतच आपापल्या जिल्ह्यातील खासदार आमदार मंत्री यांनाही कांदा प्रश्नी शेतकरी स्वतः फोन करून कांद्याच्या थेट खरेदीच्या मागणीसाठी विनंती करतील.

वरील प्रमुख नेत्यांचे अधिकृत मोबाईल नंबर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या फेसबुक ग्रुप, व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील.

करोना महामारीमुळे सततचे लाॅकडाऊन व राज्यातील बाजार समित्या कधी बंद तर कधी सुरू यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादकांना आपला कांदा वेळच्या वेळी विक्री करताना आला नाही.आज महाराष्ट्रातील 30 ते 40 टक्के कांदा चाळींमध्येच सडण्यास सुरुवात झालेली असून राज्यभरातील कांदा उत्पादकांच्या मनामध्ये केंद्रातील व राज्यातील सरकारच्या विरोधात प्रचंड संतापाची भावना आहे.

मागील वर्षी कांद्याच्या दरात वाढ झाल्यानंतर सरकारने तात्काळ कांदा निर्यात बंदी करून व विदेशातील कांदा आयात करून कांद्याचे बाजार भाव कमी करण्यासाठी पावले उचलली होती. परंतु ,आज शेतकर्‍यांचा कांदा मातीमोल दराने विक्री होत असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. संचारबंदी व वाढत्या करोना मुळे शेतकऱ्यांना थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणे शक्य नसल्याने कांदा प्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी फोन आंदोलनाचा मार्ग निवडला असल्याची माहिती यावेळी भारत दिघोळे यांनी दिली.

सरकारने कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, यासाठी यापूर्वी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ट्विटर आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पत्र लिहिण्याचे आंदोलन त्याचबरोबर राज्यातील विविध खासदार, आमदार, राज्याचे कृषीमंत्री पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून कांद्याची थेट खरेदी करावी,असे आशयाचे लेखी पत्र यापूर्वीच दिलेले आहे. परंतु , तरीही केंद्रातील व राज्यातील सरकार कांदा बाजारभावा प्रश्नी काहीही दिलासा देण्यासाठी पाऊल उचलताना दिसत नाही.

मागील 4 महिन्यांपासून कांद्याला उत्पादन खर्चा पेक्षाही कमी दर मिळत असून 11 ते 12 रूपये प्रति किलोला उत्पादन खर्च येणा-या कांद्याला सरासरी 5 ते 6 रूपये प्रति किलो दर मिळत आहे असे असले तरी देशात कांदा 25 ते 30 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होत नाही.

तरी कांदा उत्पादकांचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे राज्यातील कांदा उत्पादकांचा कांदा थेट 20 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करावा व मागील 4 महिन्यांपासून विकलेल्या कांद्याला 20 रुपये दरातील फरकाची रक्कम भरपाई द्यावी अशीही मागणी यावेळेस कांदा उत्पादक शेतकरी फोनवरून करतील. केंद्रातील व राज्यातील सरकारने कांदा उत्पादकांचा कांदा तात्काळ 20 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करावा.

यासाठी राज्यभरातील जास्तीत जास्त कांदा उत्पादकांनी या फोन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे.

या आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील, प्रदेश संघटक कृष्णा जाधव, संपर्क प्रमुख कुबेर जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, सरचिटणीस दुष्यंत पवार, युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, युवा जिल्हा उपाध्यक्ष शेखर कापडणीस व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून एकच प्रमुख मागणी

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या या फोन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट 20 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करावा ही एकमेव प्रमुख मागणी केली जाणार आहे.मंगळवारी 28 जूलैला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे फोन आंदोलन करण्यात येईल.

भारत दिघोळे,संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com