पालखेड कालव्याच्या पाण्यासाठी याचिका दाखल

पालखेड कालव्याच्या पाण्यासाठी याचिका दाखल

पाटोदा। वार्ताहर Patoda

पालखेड डाव्या कालव्यावरील ( Palkhed Canal ) वितरिका क्रमांक 46 ते 52 या आठमाही करण्यासाठी आता आंदोलकांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग निवडला असून, गवंडगाव ( Gavandgaon ) येथील शेतकर्‍यांनी याचिका दाखल केली आहे.

गवंडगाव येथील संजय भागवत, नानासाहेब भागवत, गोरख भागवत व हरिभाऊ साळुंखे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. नीलेश भागवत यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. ही याचीका न्यायमूर्ती के. के. तातेडे व न्यायमूर्ती पी.के. चव्हाण यांच्या खंडपीठाने दाखल करून घेत दि. 20 रोजी सुनावणी वेळी प्रतिवादींना 15 सप्टेंबर पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे.

या बाबत माहिती अशी की, पालखेड पाटबंधारे विभाग अंतर्गत डाव्या कालव्यावर 1 ते 52 अशा वितरिका आहेत. पैकी 1 ते 45 वितरिका या आठमाही असून तालुक्याच्या पूर्वेकडील व वैजापूर, कोपरगाव तालुक्यास लाभार्थी ठरणार्‍या वितरिका क्र. 46 ते 52 या आठमाही करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यासाठी आजवर लाभार्थी क्षेत्रातील अनेक वंचित लाभार्थी शेतकर्‍यांनी आंदोलन उभे केले. त्यातून अनेकांवर गुन्हे दाखल झाले. 2012च्या आंदोलनातील 249 आंदोलक आजही या आंदोलनातील गुन्हेगार आहेत. आता या आंदोलनाच्या लढाईला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे.

गवंडगाव, अंदरसुल पूर्व, रस्ते सुरेगाव, देवठाण, देवळाने, खामगाव येथील वितरिका 46 ते 52 च्या लाभार्थी शेतकर्‍यांनी शासन व जलसंपदा विभागाने शेतकर्‍यांची मागणी पूर्ण न केल्यामुळे न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचे ठरविले.

या शेतकर्‍यांनी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. भागवत यांच्यामार्फत याचिका दाखल केली असून, कालव्याची पार्श्वभूमी, पाण्याची गरज व उपलब्धता, कालव्याचा खर्च, शेतकर्‍यांची मागणी, नैसर्गिक स्त्रोतांचा समान वाटपाचा अधिकार या मुख्य मुद्यांच्या आधारे वितरिका 46 ते 52 आठमाही पाणी मिळावे, अशी विनंती उच्च न्यायालयात करण्यात आलेली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com