कांदाविक्री बंदबाबत समज, गैरसमज आणि वास्तव

कांदाविक्री बंदबाबत समज, गैरसमज आणि वास्तव

नाशिक । विजय गिते

कांद्याने केला वांदा, कांद्याने सरकारे पडली, कांद्याचे भाव गडगडले,कांद्यासाठी रास्ता रोको, आंदोलने,कांद्याला भाव नसल्याने शेतकर्‍यांनी ओतला रस्त्यावर कांदा ’ अशी विविध शीर्षके असलेले वर्तमानपत्रातील वृत्त, वृत्त वाहिन्यांवरील बातम्या आपण वाचत व पाहत आलो आहे. मात्र, आता १६ ऑगस्टपासून कांदा उत्पादक (Onion grower) शेतकर्‍यांनी एका नवीन अनोख्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

कांद्याचे भाव पडतात म्हणून आंदोलन न करता आपला कांदा (Onion) मार्केटमध्ये न नेण्याचा व विक्री न करण्याचा निर्णय कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्यामुळे हे आंदोलन एक आधुनिक पद्धतीने होणार आहे, यात शंका नाही. कांद्याला सरासरी २५ रुपये प्रतिकिलो दर न मिळाल्यास १६ ऑगस्टपासून कांदा (Onion) विक्री बेमुदत बंद करू,असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने (Maharashtra State Onion Growers Association) दिला असून यात त्यांना किती यश येते,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गेल्या सात आठ महिन्यांपासून कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे कोट्यवधीचे नुकसान (damage) झाले आहे, असे असताना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने (Central Government) कांदा उत्पादकांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.कांद्याला थोड्याफार दिवसांसाठी भाव वाढल्यावर तत्काळ एका दिवसात कांदा निर्यातबंदी करणे, परदेशी कांदा आयात करणे, कांदा व्यापार्‍यावरती धाडी टाकणे, कांदा साठ्यावर मर्यादा घालणे अशा विविध क्लुप्त्या वापरून कांद्याचे दर पाडण्याचे काम सरकारकडून केले जाते.

मात्र,आता शेतकर्‍यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे.अशावेळी सरकारचे मात्र शेतकर्‍यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.आमदार (MLA) खासदार (MP) मंत्री (Minister) केंद्रीय मंत्री (Union Minister) यांनीही कांदा प्रश्नावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका न घेतल्याने कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही गेल्या काही महिन्यांत रास्तारोको, मोर्चे,आंदोलने (agitations) राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून तसेच कांदा परिषदेच्या माध्यमातून घसरलेल्या कांदा दरप्रश्नी आवाज उठवला आहे, पाठपुरावा केलेला आहे. परंतु, तरीही कांद्याच्या दरात वाढ होण्यासाठी सरकारकडून कोणतेही पावले उचललीे गेली नाहीत.

एकीकडे शेतकर्‍यांच्या कांद्याला बाजार समितीत मातीमोल भाव मिळत असताना यावर्षी नाफेडकडून अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला. परंतु, नाफेडनेही शेतकर्‍यांचा कांदा १० ते १२ रुपये प्रति किलो याप्रमाणे खरेदी करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला २० ते २२ रुपये येत असतांना शेतकर्‍यांना मागील काही महिन्यांपासून कांद्याला सरासरी ८ ते १० रुपये इतका कमी दर मिळत आहे.

शेतकर्‍यांनी आपापल्या चाळींमध्ये एप्रिल ते मे महिन्यामध्ये कांद्याची साठवणूक केलेली असून खराब हवामानामुळे (bad weather) चाळींमधील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर बाजार समितीत कांदा विक्री केल्यास मातीमोल दर मिळाल्याने शेतकर्‍यांचे दुहेरी नुकसान सुरू आहे. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांच्या कांद्याला लिलावात सरासरी २५ रुपये प्रति किलोचा दर मिळावा. अन्यथा,१६ ऑगस्ट २०२२ पासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद करतील.

देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणार्‍या महाराष्ट्रातून कांद्याची शंभर टक्के विक्री बंद झाल्यास देशात कांदा टंचाई निर्माण होऊन सरकारवर दबाव तयार होईल आणि शेतकर्‍यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त म्हणजे सरासरी २५ रुपये दर मिळावा,म्हणून हे कांदा विक्री बंद आंदोलन केले जाणार आहे,असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी म्हटले आहे.

मजुरी-खते दरवाढीचा आलेख चढताच

शेतकरी मित्रांनो, प्रत्येकाला आठवत असेल की, सुफला 15.15.15 गोणी ५०० ते ६०० रुपयाला होती. किंवा कुठल्याही खताची गोणी असो तिची ५ ते १० वर्षा पूर्वीची किंमत आणि कांद्याला मिळणारा तेव्हाचा भाव आणि आत्ताचा भाव किती तफावत आहे.प्रत्येक कंपनी असो किंवा अजून दुसरे कोणी कोणीही तोट्यात धंदा करत नाही .पण या कृषिप्रधान देशात वर्षोनुवर्षे शेतकर्‍यांनीच तोट्यात धंदा करायचा का ? शेती हा एक व्यवसायच आहे .अशी कोणती कंपनी आहे जी आज अस्तित्वात आहे की जी कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन १० रुपये प्रति किलो आणि विक्री ५ रुपये प्रति किलो असा व्यवहार करते. होय आहे तर ती म्हणजे शेती कंपनी.

पाचशे रुपये खताची गोणी होती तेव्हा कांदा १० रुपये किलो होता.आणि आज १५०० रुपये गोणी झाली तरी कांदा १० रुपये किलोच आहे.वा रे वा ! लेबरचे चार्ज २०० रुपयांवरून २५० रुपये ,गाडी भाडे ४०० रुपयांवरून ६०० रुपये , फवारे मारणारे २५० रुपयांवरून ५०० रुपये एकर ,कांदे भरायची गोणी २५ रुपयांवरून ४० रुपये आणि आमचे कांदे १० रुपये किलोच. त्यामुळे हा लढा आपल्या अस्तिवाचा आहे .आपण जर असेच अन्याय सहन करत राहिलो तर एक दिवस आपलेच अस्तित्व संपून जाईल.शेतकरी मित्रांनो ७.२५ रुपये आपला कांदा पिकवण्याचा किलोचा खर्च आहे .त्यामुळे १० रुपये किलोने आपल्याला कांदा परवडणार नाही.त्यामुळे पुढील सूचना येई पर्यंत कांदा कोणी विकू नये. आपली उणीव ही सरकारला जाणवली तर आपल्याकडे कोणी लक्ष देऊ शकत नाही.असे भावनिक आवाहन संघटनेकडून केले जात आहे त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता किती असेल हे लवकरच लक्षात येईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com