महाआघाडीमुळे जनतेच्या विश्वासाला तडा

माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
महाआघाडीमुळे जनतेच्या विश्वासाला तडा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

जनतेची विश्वासार्हता जपल्यामुळेच भारतीय जनता पक्ष ( BJP ) आज केंद्रात व अनेक राज्यात सत्तेवर आहे. महाराष्ट्रात विधानसभेत जनतेचा कौल हा भाजपला होता. मात्र महाविकास आघाडीच्या अनैसर्गिक युतीने या विश्वासाला तडा देण्याचे काम केले असल्याची टीका करत भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (BJP state general secretary Chandrasekhar Bavankule ) केली.

आगामी काळात भाजपचे सर्वाधिक आमदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. मालेगावात भाजपचा आमदार असणार आहे त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबुतीसाठी सक्रिय व्हावे, असे आवाहन येथे बोलताना केले.

युवा वॉरियर्स जोडणी अभियानाच्या उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर असलेल्या भाजप प्रदेश सरचिटणीस, माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील नेत्यांनी काल मालेगावी भेट दिली. ढवळेश्वर येथे युवा मोर्चा शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करतांना बावनकुळे बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेशनाना निकम, दादा जाधव, संदीप पाटील, लकी गिल, जि. प. सदस्या मनीषा पवार, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, अरुण पाटील, नंदूतात्या सोयगावकर, पोपट लोंढे, देवा पाटील, संजय निकम, संजय हिरे, नगरसेवक संजय काळे, विजय देवरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश पाकळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष धनंजय पवार, प्रकाश मुळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाठीत खंजीर खुपसणार्‍यांना धडा शिकविण्याची वेळ आली असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तयार राहण्याचे आवाहन बावनकुळे यांनी शेवटी बोलताना केले.

शिवसेनेसोबत भाजपने प्रामाणिकपणे मैत्री केली. परंतु सेनेने भाजपच नव्हे तर युतीला मते देणार्‍या जनतेचा देखील विश्वासघात केल्याची टीका युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली. खंडणीखोरी, युवतींवर अत्याचार, विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात नंबर वनवर असलेल्या तिघाडी सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

या विश्वासघातकी महाआघाडी सरकारच्या काळात जनतेच्या भाजप व युवा मोर्चाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे युवा वॉरियर्सच्या माध्यमातून 18 ते 25 वयोगटातील अराजकीय युवकांना जोडण्यासाठी खर्‍या अर्थाने हा संपर्क दौरा सुरू करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासह जनसंपर्क वाढविण्यात आला आहे. मालेगाव बाह्यमध्ये आगामी काळात भाजपचाच आमदार होणार आहे. यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय होत काम करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी यावेळी बोलताना सांगितले. खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाने जि. प. गटांमध्ये विविध विकासाची कामे साकारली जात असून जिल्हा उपाध्यक्ष समाधान हिरे यांच्या मोरगन प्रकल्पामुळे शेकडो तरुण आणि शेतकर्‍यांना रोजगार मिळाल्याचे तालुकाध्यक्ष नीलेश कचवे यांनी सांगितले.

शत प्रतिशत भाजप हा आमचा उद्देश असल्याचे मनोगत जि. प. सदस्या मनीषा पवार यांनी आपल्या भाषणात केले. भाजप हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली आहे, असे लकी गिल यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com