दिंडोरी नगर पंचायत सेवकांंचे प्रश्न प्रलंबितच

दिंडोरी नगर पंचायत सेवकांंचे प्रश्न प्रलंबितच
दिंडोरी नगरपंचायत

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी नगरपंचायत सेवकांंचा किमान वेतन लागू करण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित पडला असून त्यामुळे सेवक वर्गात संताप व्यक्त होत आहे. कामगार उपायुक्तांनी आदेश देऊनही प्रश्न प्रलंबित रहात असल्याने नेमकी यामागील कारण काय? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

दिंडोरी नगरपंचायतीच्या सेवकांना सरकारी नियमानुसार किमान वेतन मिळणे आवश्यक होते. याकामी सेवकांंनी प्रांत कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यावेळी प्रांतानी किमान वेतन लागू करण्याचे आश्वासन दिले होते.

नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांनी किमान वेतन लागू न केल्याने सदर प्रश्न कामगार उपायुक्तांकडे मांडण्यात आला. कामगार उपायुक्तांनी सत्य बाजू घेत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कामगारांना शासकीय नियमाप्रमाणे किमान वेतन लागू करण्याचा आदेश दिंडोरी मुख्याधिकार्‍यांना दिला. हा आदेश येवून आता अनेक महिने उलटले असून तरी सुध्दा कामगारांना किमान वेतन लागू करण्यात आले नाही.

काही कामगार आता सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे त्यांना शासकीय लाभ मिळण्यास विलंब होत आहे. दिंडोरीच्या चतुर्थ श्रेणी कामगारांनी करोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून दिंडोरीकरांची सेवा केली होती. त्यामुळे दिंडोरीकरांच्या मनात कामगारांच्या प्रती सहानुभूती आहे.

परंतु कामगारांना न्याय मिळत नसल्याने सामान्य मतदारही आता विचार करू लागले आहे. कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळत नसल्याने राज्यस्तरावर प्रश्न गेला असून माकप नेते डॉ. डी. एल. कराड व माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी कामगार प्रश्नांत लक्ष घालण्याच्या अपेक्षा दिंडोरी शहरातील जनतेने आणि श्रमिक संघटनांनी केली आहे.

24 फेब्रुवारी 2015 च्या किमान वेतन अधिनियम 1948 अधिसूचनेनुसार कामगार उपायुक्त शिर्के यांनी मुख्याधिकार्‍यांना दिंडोरी नगरपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतन व फरक देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर बैठका झाल्या, परंतु कामगारांचा प्रश्न काही सुटला नाही. आता कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला असून याबाबत माकप नेत्यांशी चर्चा सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com